रविवार म्हणजे मुंबईकरांसाठी निवांतवार.. रोज सकाळी उठून लोकल पकडायची घाई नाही की तिकीट-कूपनसाठी रांग लावायची घाई नाही.. पण कालचा रविवार त्याला अपवाद ठरला. देशातील पहिल्यावहिल्या मोनोरेलची पहिलीवहिली सफर करण्याचा मान मिळवण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. एरव्ही चौपाटी, मॉल्स, मल्टिप्लेक्स आदी ठिकाणी सुटीच्या दिवशी गर्दी करणाऱ्या मुंबईकरांनी मोनोरेलच्या स्थानकांवर तिकिटांसाठी रांगा लावल्या होत्या!
वडाळा ते चेंबूर या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणाऱ्या भारतातल्या पहिल्या मोनोरेलच्या प्रवासाचा अनुभव ‘याची देही..’घेण्यासाठी सकाळपासूनच मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. अर्थात ही गर्दी प्रवासासाठी नव्हती तर गंमत म्हणून मोनोचा अनुभव घेण्यासाठी होती. प्रवाशांचे भाबडे प्रश्न, उत्साह, कर्मचाऱ्यांचाही मोनोचे व्यवस्थापन करण्यातला नवखेपणा रविवारी स्पष्टपणे जाणवत होता. रविवारी सकाळी ७ वाजता मोनोरेल धावेल, असे जाहीर करण्यात आल्याने वडाळा डेपोत सकाळी ६ पासूनच लोकांनी रांगा लावल्या होत्या. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारांची खच्चून गर्दी होती. वडाळा डेपो हा विभाग शीव प्रतीक्षानगरला लागून असल्याने या भागातील रहिवाशांची संख्या अधिक होती. सुरुवातीला सर्वाना जिन्याखाली थांबवून ठेवण्यात आले. थेट सात वाजताच सर्वांना वर सोडल्याने एकच गलका झाला. मात्र, मोनोरेलच्या स्थानकात पाय ठेवताच एका वेगळ्या विश्वात आल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसू लागला.
तिकिटांसाठी रांगा
तिकिटासाठी प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे दुसरी खिडकी उघडण्यात आली. तिकीट म्हणून कूपन देण्यात येत होते. पैसे घेऊन यंत्रातून कॉइन काढण्यास नवख्या कर्मचाऱ्यांना वेळ लागत होता. त्यामुळे प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली. त्यातच सव्वासातला मोने सोडण्यातआली. हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींचा भरणाच जास्त होता.
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न
एरव्ही कागदी तिकिटाची सवय असलेल्या प्रवाशांना प्रथमच नाण्यांसारखे कूपन मिळत होते. परतीचे तिकीट नसल्याने वडाळ्याहून आलेल्या प्रवाशांनी मग पुन्हा तिकिटासाठी रांगा लावल्या. अनेकांनी चेंबूर मोनोरेल स्थानकाखाली असलेल्या चहाच्या टपरीवर चहा आणि गरमागरम वडय़ाचा आनंद घेतला आणि पुन्हा मोनोरेलमध्ये गेले. हे कूपन कसे लावायचे, सोबत न्यायचे का, कुठून बाहेर पडायचे, परतीचे तिकीट नाही का? असे प्रश्ना प्रवासी विचारत होते. सुरक्षेसाठी गणवेषातले कर्मचारी जागोजागी तैनात होते.
फेऱ्या वाढवल्या
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रविवारी पहिल्याच दिवशी मोनोरेलच्या फेऱ्या वाढवण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर आली. ठरल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता मोनोची फेरी थांबणार होती. मात्र, गर्दी पाहता दुपारी साडेचार वाजेपर्यंत मोनोची सेवा सुरू ठेवावी लागली. यादरम्यान मोनोच्या ६१ फेऱ्या झाल्या. वडाळा ते चेंबूर हे अंतर कापायला मोनोला १९ मिनिटांचा अवधी लागतो. पण रविवारी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे अडीच वाजता मोनोच्या स्थानकातील प्रवेश बंद करण्यात आला. त्याआधी आत गेलेल्या सर्वाना तिकिटे देण्यात आली. या सर्वाना मोनोचा प्रवास करत यावा यासाठी फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यामुळे दुपारी तीनऐवजी साडेचापर्यंत मोनोरेल मुंबईकरांसाठी धावत होती. पहिल्या दिवशी वीस हजारांपेक्षा अधिक मुंबईकरांनी मोनोचा प्रवास केल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली. १९ हजार ६७८ तिकिटे विकली गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रवाशांची नेमकी संख्या उपलब्ध झाली नाही. मोनोरेलचे सारथ्य कॅप्टन सुमनकुमार यादव आणि कॅप्टन ज्युली भंडारे यांनी केले.
..आणि गर्दी वाढत गेली
सकाळी पहिल्या फेरीपासून लोकांची जी गर्दी होती ती नंतर नंतर वाढत गेली. रांगा पार रस्त्यावर लांबच लांब गेल्या. व्हॉटस अॅप आणि फेसबुकवरही मोनोच्या पहिल्या प्रवासाचा आनंद तातडीने ‘शेअर’ केला जात होता. लहान मुलांनाही या आगळ्या वेगळ्या गाडीचे कौतुक वाटत होते.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
उत्तम पर्याय मिळाला
पहिल्या मोनोरेलमध्ये प्रवास करण्याचा ऐतिहासिक अनुभव मिळाल्याचा आनंद अहे. आम्हाला आता प्रतीक्षा नगरहून चेंबूरला जाण्याचा उत्तम पर्याय मिळाला आहे.
साधना राऊत,
मोनो डार्लिग!
गेली कित्येक वर्षे येणार-येणार म्हणून चर्चेत असलेली मोनोरेल अखेर रविवारी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-02-2014 at 12:28 IST
TOPICSमोनोरेल
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai enjoys monorail