अंबोली पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी असल्याच्या आरोपावरून शनिवारी दोघांना अटक केली. सांताक्रूझ (पश्चिम) येथील हॉटेलमध्ये एका रेव्ह पार्टीत छापा घालताना एका अभिनेत्रीला आणि तिच्या मित्रांना या दोघांनी एनसीबी अधिकारी असल्याचे सांगून पकडले होते. तसेच त्यांनी अभिनेत्रीकडून २० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर या दोघांच्या त्रासाला कंटाळून जोगेश्वरीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणारी आणि जोगेश्वरी (पश्चिम) येथे भाड्याने राहणाऱ्या २८ वर्षीय अभिनेत्रीने २३ डिसेंबर रोजी तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली कारण तिला आरोपींनी धमकी दिली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणीने घडलेल्या सर्व प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली.
याप्रकरणी आंबोली पोलिसांनी स्वत:हून दखल घेत एफआयआर दाखल केला आहे. ती अभिनेत्री अलीकडेच एका हॉटेलमध्ये तीन मित्रांसह एका पार्टीत गेली होती. तिथे दोघांनी एनसीबी अधिकारी म्हणून तिच्याकडे गेले आणि तुला ड्रग्ज घेतल्याबद्दल अटक केली जाईल, असे सांगितले. “मृत अभिनेत्री आणि तिचे मित्र घाबरले आणि त्यांनी त्यांना यातून सोडवण्याची विनंती केली. आरोपींनी ४० लाख रुपयांची मागणी केली आणि शेवटी २० लाखांवर सेटलमेंट केली, ”असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अभिनेत्रीच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, ती नैराश्यात गेली होती आणि एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था न झाल्यामुळे ती खूप तणावात होती. या अभिनेत्रीचा एक मित्र, असीर काझी, जो तिच्यासोबत पार्टीत होता, तो देखील या खंडणी रॅकेटचा भाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी सूरज परदेशी (३२) आणि प्रवीण वळिंबे (२८) यांना एनसीबीचे अधिकारी असल्याचे भासल्याचे दाखवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली. काझी आणि अन्य आरोपी सापडत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आयपीसीच्या कलम ३०६ १७०, ४२०, ३४४, ३८८, ३८९, ५०६, १२०(ब) अंतर्गत तोतया एनसीबी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.