वैद्यकीय सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचे आक्षेपार्ह अवस्थेत चित्रीकरण करून त्याच्याकडे खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील सदस्याने पोलीस अधिकारी बनून तक्रारदाराला धमकावले व त्याच्याकडून साडे सात लाखांची खंडणी उकळली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सायबर खंडणीच्या प्रकरणात यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुंबईत ५४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच ४७ गुन्ह्यांची नोंद झाली. या प्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून खार (पूर्व) येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांना फेसबुकवर मैत्री करण्याची विनंती अंकिता शर्मा नावाच्या महिलेने १४ जुलै रोजी केली होती. त्यांनी तो स्वीकारल्यानंतर दोघांचा फेसबुक मेसेंजरवर संवाद सुरू झाला. त्यानंतर महिलेने व्हिडीओ कॉल करून कपडे काढण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीने दूरध्वनी केला त्यानंतर तिने त्याचा मोबाइल नंबर मागितला. त्याने महिलेला क्रमांक दिला असता तिने व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला चेहरा दाखवण्यास सांगितले.
त्यानंतर त्याने तिला व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर ब्लॉक केले. दुसऱ्या दिवशी त्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश आला त्यात फसवणूक करणाऱ्याने त्याची चित्रफीत प्रसारीत न करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे दिले पण फसवणूक करणाऱ्याने आणखी १५ हजार रुपये मागितले. त्यानंतर त्याने शर्माला समाज माध्यमांवर ब्लॉक केले.
दुसऱ्या दिवशी तक्रारदार यांना दूरध्वनी आला, त्यात दिल्ली सायबर पोलिसांचा पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपली चित्रफीत यूट्युबवर प्रसारित झाली असून त्याबाबत तक्रार आल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एका व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक दिला. तक्रारदाराने त्या क्रमांकावर संपर्क साधला असता युट्यूबमधील अधिकारी असल्याचे भासवून आणखी एकाने काही लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने त्यांना पैसेही दिले.
दुसर्या दिवशी, तोतया पोलिस अधिकाऱ्याचा पुन्हा दूरध्वनी आला. त्याने शर्मा या महिलेने आत्महत्या केली आहे आणि तक्रारदाराला या प्रकरणात आरोपी केले असल्याचे सांगितले आणि प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली आहे. तक्रारदाराने या सायबर भामट्यांना एकूण सात लाख ५३ हजार रुपये दिले, परंतु फसवणूक करणारे अधिकची मागणी करत राहिले. त्यानंतर तक्रादाराने पोलिसांकडे धाव घेतली.