मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत संततधार सुरू आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाने जोर वाढला आहे. रात्री पुन्हा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान,आज मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई तसेच उपनगरांत मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. रात्री देखील पावसाचा जोर कायम होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले होते. शनिवारी रात्री ८:३० ते रविवारी पहाटे ५:३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरी ७७. ४ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात सरासरी १३२.२ मिमी पावसाची नोंद झाली. दहिसर (१७१.५ मिमी), राम मंदिर (१५१.५ मिमी), विक्रोळी (१३१.५ मिमी), भायखळा (६५.५ मिमी), शीव (८१.२ मिमी), माटुंगा येथे (७१.५ मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा…पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रभादेवी-दादर दरम्यान झाड पडले
दरम्यान, मोसमी पाऊस सक्रिय झाल्यामुळे घाटमाथ्यावर तसेच कोकणात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मोसमी वाऱ्यांचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. तसेच महाराष्ट्रापासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे.