मुंबई : कौटुंबिक वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात हस्तक्षेप करून तो मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करणे केम्प्स कॉर्नरस्थित पिता-पुत्राला महागात पडले आहे. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी सत्र न्यायालयाने पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांनी आरोपी रुद्रपाल अग्रवाल (६०) आणि त्यांचा मुलगा तुषार (२९) यांना भारतीय दंड संहितेच्या विविध कलामाअंतर्गत दाखल आरोपांत दोषी ठरवले. तसेच, अलिकडच्या काळात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा घटनांमुळे पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडणे कठीण होत असून या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी, अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक शिक्षा आवश्यक असल्याची टिप्पणी अग्रवाल पिता-पुत्राला शिक्षा सुनावताना केली.
या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार, १५ मे २०१८ रोजी केम्प्स कॉर्नर परिसरात राहत असलेल्या आरोपींच्या घरातून पोलिसांना दूरध्वनी आल्यानंतर पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी, अग्रवाल याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांचे भांडण सुरू होते. ते विकोपाला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींच्या घरी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करून ते थांबवण्याचा आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तुषार याने आपल्या कानशिलात लगावली, तर कुटुंबातील इतर सदस्यांनी आपल्यासह अन्य पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केली, असे उपनिरीक्षक विनोद कांबळे यांनी न्यायालयात साक्ष नोंदवताना सांगितले.
कांबळे यांच्याव्यतिरिक्त, फिर्यादी पक्षाने इतर आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्या सगळ्यांची दखल घेऊन आरोपींनी कौटुंबिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि कर्तव्य बाजवणाऱ्या पोलिसांना मारहाण केली. तसेच, त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखले. हे सिद्ध करण्यास सरकारी पक्ष यशस्वी झाल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले. त्याचप्रमाणे, अग्रवाल पिता-पुत्राला त्यांच्यावरील आरोपांत दोषी ठरवून एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.