मुंबई : मुंबईत बुधवारी सकाळपासूनच उकाडा जाणवू लागला. कमाल तापमानाचा पारा मंगळवार इतकाच होता. मात्र वातावरणातील आर्द्रतेमुळे बुधवारी उकाडा अधिक होता. ढगाळ वातावरण कमी झाल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बुधवारी उन्हाचा ताप सहन करावा लागला. दरम्यान, राज्यातील किमान तापमानातही वाढ झाली आहे. काही भागात धुके आणि ढगाळ वातावरणामुळे पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी झाला आहे. ही स्थिती पूर्ववत व्हायला अजून दोन – तीन दिवस लागतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३२.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केद्रांवरील कमाल तापमान हे मंगळवार इतकेच होते. तरीदेखील बुधवारी मुंबईकरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. शहरातही उन्हाचा ताप जाणवत होता. कुलाबा येथे बुधवारी सरासरीपेक्षा २.१ अंश, तर सांताक्रूझ येथे ३.६ अंशाने कमाल तापमान अधिक नोंदले गेले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान पालघर येथे ३५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्याखालोखाल ठाणे येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा…बॉलिवूड कलाकारांनी परदेशात केले नववर्षाचे स्वागत
कमाल तापमानाबरोबरच मुंबईच्या किमान तापमानातही वाढ झाली. मागील दोन – तीन दिवसांपासून ही वाढ कायम असल्याने सध्या मुंबईत पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी झाला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात अंशत: ढगाळ वातावरणाबरोबरच काही भागात सकाळी धुके पसरलेले असते. तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातही थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, पुढील दोन तीन दिवसांत राज्यात पुन्हा थंडी जोर धरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
थंडी पडण्यासाठी किमान तापमानात घट होणे गरजेचे असते. कमाल तापमनाचा पारा पुढील दोन – तीन दिवसांत सरासरीपर्यंत खाली उतरेल. त्यानंतर मुंबईत पुन्हा थंडीत वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.