मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये एका १९ वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना रविवारी घडली. दोन महिला टीसींच्या सावधगिरीमुळे या मुलीचा जीव वाचला आहे. पिंकी रॉय असं या १९ वर्षीय मुलीचं नाव आहे. मुंबईतल्या धकाधकीच्या आयुष्यात ट्रेनचा प्रवास हा आवश्यकच मानला जातो. मात्र याच ट्रेनमध्ये पिंकी रॉयला हार्ट अटॅक आला. ती कामावरून आपल्या घरी म्हणजेच कर्जतला चालली होती. त्याचवेळी तिच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर दोन महिला टीसींनी तिला तातडीने ठाण्यात आणलं आणि तिचा जीव वाचवला.
नेमकी काय घडली घटना?
पिंकी रॉय ही घणसोली या ठिकाणी असलेल्या एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम करते. ती घणसोलीवरून ट्रान्स हार्बर मार्गाने आपल्या कामावरून घरी परतत होती. त्यावेळी तिला अचानाक छातीत दुखू लागलं. पिंकी रॉयच्या आईने दिलेल्या माहितीनुसार पिंकी दुपारी १.३० च्या सुमारास घणसोलीहून ठाण्याला येत होती. ही ट्रेन जेव्हा ऐरोली स्टेशनवरून पुढे निघाली तेव्हा पिंकीच्या छातीत दुखू लागलं.
त्यावेळी टीसी दीपा वैद्य आणि जेन मार्सेला या दोघी तिकिट तपासत होत्या. या दोघी सुदैवाने लोकलच्या त्याच डब्यात होत्या जिथे पिंकी बसली होती. पिंकीच्या छातीत दुखू लागल्याने या दोघींनी तातडीने ठाणे स्टेशन व्यवस्थापकांना ही बाब कळवली आणि वैद्यकीय मदत तयार ठेवण्यास सांगितली.
हे पण वाचाः नैराश्य ठरतंय मधुमेह, रक्तदाबापेक्षा जीवघेणं
ठाण्यात आल्यानंतर काय घडलं?
पिंकीची ट्रेन जेव्हा ठाण्यात आली तेव्हा तिला तातडीने ठाण्यातल्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक या ठिकाणी असलेल्या मेडिकल क्लिनिकमध्ये आणण्यात आलं. आम्ही जेव्हा पिंकीला या ठिकाणी घेऊन आलो तेव्हा तिची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर आम्ही तातडीने पिंकीला ठाणे सरकारी रूग्णालय या ठिकाणी घेऊन गेलो. आम्हाला रेल्वे पोलीस आणि काही प्रवाशांनी यासाठी सहकार्य केलं अशी माहिती टीसी दीपा वैद्य यांनी दिली.
पिंकीला हृदय विकाराचा त्रास
पिंकी रॉय ही तरूणी कर्जतला राहते. तिला जेव्हा ठाणे सरकारी रूग्णालय या ठिकाणी दाखल केलं तेव्हा तिला मध्यम स्वरूपाचा हृदय विकाराचा झटका आला आहे हे डॉक्टरांनी सांगितलं. या दरम्यान ही सगळी घटना पिंकीच्या आई वडिलांनाही कळवण्यात आली. पिंकीला हृदयविकाराचा पूर्वेतिहास आहे. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आल्यानंतर पिंकीची आई देखील ठाण्यात पोहचली. तिने आपल्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल दोन्ही महिला टीसींचे आभार मानले. फ्री प्रेस जर्नल ने वृत्त दिलं आहे.