मुंबई : पावसाळी आजार, डेंग्यू आणि हिवताप यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून ‘फीव्हर ओपीडी’, विभागीय वॉर रूमची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र ही सेवा पुरवण्यासाठी लागणारे कर्मचारी रुग्णालयांकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी, ही सेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमधील रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर प्रादुर्भाव होणाऱ्या साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतात. त्याअनुषंगाने यावर्षी मुंबई महानगरपालिकेने सर्व प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘फीव्हर ओपीडी’, विभागीय वॉर रूमची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी प्रमुख रुग्णालयांमध्ये २४ तास तर उपनगरीय रुग्णालयात सायंकाळी बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध केली आहे. तसेच तीन हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग रुग्णालयांकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. मुंबई महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्येच ही सेवा पुरवण्याचा प्रशासनाकडून घाट घालण्यात येत आहे. परिणामी, दिवसरात्र काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर याचा अतिरिक्त ताण पडत असल्याने कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा – दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावरच चरित्रपट होऊ शकतो – विकी कौशल
पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अमलबजावणी यशस्वीरित्या व्हावी यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळी आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.