मुंबई : भूतदया म्हणून प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न खाऊ घालत असाल तर यापुढे पालिका तुम्हाला ५०० रुपये दंड करणार आहे. कबुतर, कुत्री, मांजरी, गायी यांना सार्वजनिक ठिकाणी कोणी खाऊ घालत असेल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर अशा प्रकरणात ५०० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नव्या नियमावलीत ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. याबाबत येत्या काळात कठोर कारवाई करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीचा मसुदा १ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहेत. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदल करून नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यात रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

कबुतरांना खाणे देणे महागात

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतरखाना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच इतरत्रही अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे घालून अनधिकृत कबुतरखाने सुरु झाल्याबद्दल नागरिक समाजमाध्यमावर संताप व्यक्त करत असतात. मांजरीना, श्वानांना रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांवरूनही अनेकदा वाद होत असतात.

मुंबईतील अनधिकृत कबुतरखाने आणि दादरचा सुप्रसिद्ध कबुतरखाना बंद करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पुन्हा एकदा मोहीम सुरु केली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने याकरीता मुंबई महानगरपालिका आणि पोलिस विभागाकडेही मागणी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर ही तरतूद विशेष ठरणार आहे.

उपद्रवशोधक नेमणार

महानगरपालिकेच्या नव्या नियमावलीत प्राणी पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आधीच्या नियमावलीतही होती. मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नव्हती. रस्त्यावर कचरा किंवा घाण करणाऱ्यांवर दांडात्मक कारवाईसाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने आता उपद्रवशोधकांची संख्या वाढण्याचे ठरवले आहे. पालिकेकडे उपद्रवशोधकांची पदे रिक्त असून त्यात नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबईतील कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोकाही वाढतो आहे. या विषयावर गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरातून जनजागृती केली जात आहे. मात्र हा विषय मागे पडत जातो. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने गेल्या काही महिन्यांपासून हा विषय पुन्हा एकदा लावून धरला आहे.

मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले, मुंबईत विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतपणे कबुतरखाने उभे राहिले आहेत. समुद्र किनाऱ्यांवर कबुतरांसाठी धान्य विकत बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तेथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढते आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरत आहेत. लोकांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत कबुतरखाने बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंदुजा रुग्णालयाजवळ समुद्र किनाऱ्यावर असाच कबुतरखाना अनधिकृतपणे तयार होत होता तो बंद करण्यात आला आहे. कबुतरांना दाणे घालू नये असा पालिकेचा फलक असून त्या खालीच दाणे, गाठ्या विकणारा इसम बसत होता अशीही माहिती शृंगारपुरे यांनी दिली.

बीएनएचएसकडूनही जनजागृतीदरम्यान, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणवादी संघटनेनेही कबुतरांच्या वाढत्या संख्येविषयी चिंता व्यक्त करणारा एक माहितीपट नुकताच प्रदर्शित केला होता. ‘कबुतरखाना : शहरी भागातील कबुतरांचा धोका’ हा माहितीपट कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे भविष्यात मानवाला कसे श्वसनाचे आजार जडू शकतात याबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. शहरांमधील लोक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देत असल्यामुळे कबुतरांच्या संख्येची अनियंत्रित वाढ होत आहे. व त्यामुळे पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याचे त्यात म्हटले आहे.