दुर्घटनास्थळी तातडीने मदतकार्य करण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार
आग आणि इमारत कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन ‘मुंबई अग्निशमन दला’च्या कार्यप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत असून प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी मदतकार्य करण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर – एसओपी) तयार करण्यात आली आहे. आता दुर्घटनास्थळावरील प्रत्येक कामाची जबाबदारी अग्निशमन दल, तसेच अन्य यंत्रणांतील अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येणार आहे. तसेच घटनास्थळी प्रवेश र्निबधित करून मदतकार्यातील अडथळाही दूर करण्यात येणार आहे. त्यामुळे मदतकार्यामधील अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या नव्या कार्यप्रणालीमुळे दलाची कामगिरी अधिक सफाईदार होणार असली तरी त्याच्या अंमलबजावणीस आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
काळबादेवी येथील हनुमान गल्लीतील ‘गोकुळ निवास’ इमारतीस लागलेल्या आगीत तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांसह चार अधिकारी शहीद झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात होती. मदतकार्य कसे करावे याबाबत लिखित स्वरूपाची माहिती आजतागायत अग्निशमन दलाकडे नव्हती. परिस्थिती पाहून घटनास्थळी मदतकार्य केले जात होते. समन्वयाच्या अभावामुळे काही वेळा त्यात गोंधळ उडत होता. परंतु आता अग्निशमन दलाने मदतकार्यासाठी नवी प्रमाणित कार्यप्रणाली तयार केली आहे.
मदतकार्यात समन्वयाचा अभाव राहू नये म्हणून दुर्घटनास्थळावरील प्रत्येक कामाची जबाबदारी पदानुसार अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येणार आहे. एखाद्या दुर्घटनेची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचणाऱ्या अग्निशमन दलाच्या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याला तेथील मुख्य अधिकारी म्हणून भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्याच्या मदतीसाठी दुसरा वरिष्ठ अधिकारीही सज्ज असणार आहे. आग विझविण्यासाठी लागणारे पाणी, कोसळलेल्या इमारतीचा मातीचा ढिगारा उपसण्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही ठरावीक अधिकाऱ्यावर सोपविली जाणार आहे. दुर्घटनास्थळी कार्यशाळा प्रमुख, आवश्यक उपकरणे उपलब्ध करणे, समन्वय साधला जावा, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आदींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाणार आहे. घटनास्थळी उपनियंत्रण कक्ष वाहन उपलब्ध करून संबंधितांना संदेश देण्यासाठी अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी होते. परंतु आता घटनास्थळापासून १०० मीटर परिसरात केवळ अग्निशमन दलालाच प्रवेश मिळणार आहे.
आणीबाणी व्यवस्थापनाचा बारकाईने अभ्यास करून अग्निशमन दलासाठी नवी कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमुळे मदतकार्य सुरळीत पार पडेल आणि दुर्घटनाग्रस्तांना जलदगतीने मदतही मिळेल. या कार्यप्रणालीवर पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यावर निर्णय झाल्यानंतर आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंजुरी दिल्यानंतर एक महिन्यात संबंधितांना प्रशिक्षण देऊन या नव्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येईल.
– प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी