मुंबईतल्या साकीनाका भागात आज पहाटे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झालं. साकीनाका या मेट्रो स्टेशनच्या जवळच्या दुकानाला ही आग लागली. राज श्री असं या दुकानाचं नाव आहे. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आगीचा पुन्हा भडका उडाला. आत्ताही अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत. काही स्थानिकांनी ट्विटरवर या घटनेचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
आग नियंत्रणात आणल्यावर पुन्हा भडका
राज श्री या साकीनाका भागातल्या दुकानाला पहाटे तीनच्या दरम्यान आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्यात तासात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आग नियंत्रणात आली आहे असं वाटत असतानाच पहाटे पाच वाजता आगीचा पुन्हा भडका उडाला. ज्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या पुन्हा एकदा घटनास्थळी पोहचल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या आल्या असून फायर कुलिंगचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे.
आग दुर्घटनेत आणखी एक कामगार आत अडकल्याची भीती वर्तवण्यात येत होती. आग नियंत्रणात आणण्याचं कार्य सुरू असताना एका व्यक्तीला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. गणेश देवाशी असे या २३ वर्षीय युवकाचे नाव असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.
साकीनाका भागात धुराचे लोट
सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र साकीनाका भागात आगीमुळे धुराचे लोळ पसरले आहेत. या आगीमध्ये दोन दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान माहिती घेत आहेत.