मुंबई : मुंबईकरांसाठी सतत तत्पर असणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाने नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा संमेलनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या क्रीडा संमेलनात क्रीडा आणि अग्निशमन कवायत स्पर्धांमध्ये मुंबई अग्निशमन दलाने तब्बल ४४ पदके पटकावली. त्यात २० सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा संमेलनात मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी शारीरिक सहनशक्ती, सांघिक कार्यातून हे यश संपादन केले. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई अग्निशमन दलाने ही कामगिरी केली.
नवी दिल्ली येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. या राष्ट्रीय स्पर्धेत प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ४४ पदके जिंकली. त्यात २० सुवर्ण, १४ रौप्य आणि १० कास्य पदकांचा समावेश आहे.या स्पर्धेत देशभरातील अग्निशमन दलांचे संघ एकत्र आले होते. स्पर्धेत अग्निशमन कवायती, बचाव कार्य, मैदानी क्रीडा आणि सहनशक्ती-आधारित आव्हानांमध्ये अग्निशमन दलांच्या संघांचे कौशल्य पणाला लागले होते. त्यात मुंबई अग्निशमन दलाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली