मुंबई : मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईतील प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. विशेष म्हणजे दादर येथील फुलबाजारात शनिवारी पहाटेपासूनच फुले, तोरण खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. झेंडू शनिवारी प्रति किलो ८० रुपये दराने विकला जात होता.
दादर फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी शनिवारी पहाटेपासून नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. विरार, ठाणे आदी भागांतील नागरिक फुलांची खरेदी करण्यासाठी तेथे आले होते. गुढीपाडव्याला असणारी मागणी लक्षात घेऊन पिवळ्या आणि केशरी झेंडूच्या फुलांची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात झाली. पिवळा आणि केशरी झेंडू ८० रुपये प्रति किलो दराने विकण्यात येत होता. फुलबाजारात शनिवारी सकाळी सुमारे ३०० किलोहून अधिक झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. यापैकी बहुतांश फुलांची विक्री दुपारी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी-तलम, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचे हार, माळा आणि साखरगाठी यांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात झाली. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी तयार गुढी विक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात लगबग सुरू होती. लाल, पिवळा, नारंगी आणि पांढऱ्या रंगांच्या साखरगाठींनी दुकाने सजली होती. गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाच्या पानांची मोठी आवक झाली असून कडुनिंबाची जुडी दहा ते पंधरा रूपयांत उपलब्ध होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा परिणाम फूल उत्पादनावर होऊ लागला आहे. बिजली, शेवंती यांचे दर ८० ते १०० रुपये इतके होते. तर गावठी गुलाबाच्या गुच्छाची किंमत ६० ते १०० रुपये इतकी होती. तसेच दरवाजाला लावण्यात येणाऱ्या तोरणांची किंमत ५० ते ६० रुपये इतकी होती.
गुढीपाडव्यानिमित्त पूजा साहित्यासोबतच श्रीखंड, आम्रखंड आदी गोडधोड पदार्थांना मागणी असते. यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारची पुरणपोळी विक्रीसाठी उपलब्ध आहे. पारंपरिक पद्धतीबरोबरच विविध प्रकारे पुरणपोळी बनवली जाते. डाळ, तीळ, गाजर, खजूर, खव्याची, सागरविरहित, गुलकंद, चॉकलेट असे विविध पुरणपोळीचे प्रकार गुढीपाडव्यानिमित्त बाजारात उपलब्ध होते. पाडव्यानिमित्त आंब्याचीही मोठ्या प्रमाणार विक्री झाली.
गुढी वस्त्राला मागणी
गुढी वस्त्रांमध्ये सुती, खण, रेशमी, सेमी सिल्कच्या वस्त्रांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. खण कापडाच्या काठावर सोनेरी रंगाच्या लेसमुळे ही वस्त्र अधिक आकर्षक दिसतात. गुढी सजविण्यासाठी नागरिकांचा या वस्त्रांकडे कल वाढू लागला आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा झेंडू स्वस्त
वाढत्या मागणीमुळे तसेच कडक उन्हामुळे गेल्यावर्षी झेंडू प्रति किलो २०० रुपये दराने विकला जात होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुले स्वस्त आहेत. यंदा अवकाळी पाऊस असला तरी फुलांची आवक चांगली झाली. त्यामुळे भाव कमी आहेत. झेडुच्या फुलांचे दर रविवारी २० ते ३० रुपयांनी वाढतील, असे फुल विक्रेते विक्रम चौबे यांनी सांगितले.