मुंबई : मुंबई महानगरपालिकेने घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड आणि शीव – पनवेल महामार्गादरम्यानच्या जंक्शनवर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे १ हजार २७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे या जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांची सुटका होऊ शकणार आहे.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने शहर व उपनगरात ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारले आहेत. त्याशिवाय पादचारी पुलांसह स्कायवॉक, नाल्यावरील पूल, भुयारी मार्गही बांधण्यात आले आहेत. पालिकेच्या गोवंडी एम-पूर्व विभागातील शीव – पनवेल महामार्गावर महाराष्ट्र नगर जवळील टी जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तज्ञ समितीच्या माध्यमातून अभ्यास केला होता. टी जंक्शनवर उड्डाणपूल बांधण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड पूर्व उपनगरांमधील वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. सध्या घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपूल शीव – पनवेल महामार्गापूर्वी संपतो. त्यामुळे घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड व शीव – पनवेल महामार्गाला मिळणाऱ्या जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

हेही वाचा – अंधेरीमधील महापालिका शाळेत मतदानाविषयी जनजागृती

वाशीहून सकाळी घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडच्या दिशेने आणि संध्याकाळी घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे टी जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीत अनेकदा वाहनचालकांना अडकून पडावे लागते. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन वायू प्रदूषणात भर पडते. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या उद्देशाने प्रकल्प सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – बोरिवलीमध्ये बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

प्रकल्प सल्लागारांनी तयार केलेल्या प्रस्तावित आराखड्यानुसार घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरून वाशीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर वाशीकडून येणाऱ्या वाहनांसाठी विद्यमान घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावर जाणाऱ्या वाहतुकीसाठी दुसऱ्या स्तरावर स्वतंत्र उड्डाणपूल मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.