खरे तर तसे प्रत्येक गाव आणि शहराचे त्याच्या भौगोलिकतेशी अनन्यसाधारण असे नाते असतेच. पण मुंबईच्या बाबतीत बोलायचे तर त्या नात्याची वीण इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक घट्ट आहे. महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून असलेले मुंबईचे महत्त्व, आर्थिक राजधानीचे शहर म्हणून असलेला दिमाख, हा सारा मुंबईच्या भौगोलिकतेवर आणि भूशास्त्रीय रचनेवरच उभा आहे. एका वेगळ्या अर्थाने म्हणायचे तर इथल्या भूगोलाचा पाया या मुंबईला व्यंगार्थाने आणि वाच्यार्थानेही लाभलेला आहे.

साष्टी बेट म्हणजे मूळ मुंबईच्या (भाईंदर ते वांद्रे) परिसरात लाव्हाउत्सर्गातून उभ्या राहिलेल्या दोन डोंगररांगा ज्याप्रमाणे पाहायला मिळतात तशा पर्वतरांगा नव्हे पण अनेक डोंगर आपल्याला आजच्या मध्य आणि दक्षिण मुंबईत पाहायला मिळतात. याही छोटेखानी डोंगररांगाच होत्या, ज्वालामुखीनंतरच्या शेकडो वर्षांच्या काळात. मात्र यातील अनेक टेकडय़ा किंवा मोठे खडक धूप होऊन नष्ट झाले तर काही अगदी अलीकडे मुंबईच्या नवनिर्मितीसाठी पायाभरणी म्हणून वापरण्यात आले. सध्या डॉकयार्ड, शिवडी, वडाळा, कोळीवाडा, शीव, कुर्ला अशा पूर्वेकडील बाजूस काही टेकडय़ा दिसतात. तर पश्चिमेकडील बाजूस वाळकेश्वर, वरळी, वांद्रे इथे टेकडय़ा दिसतात. यापैकी शिवडी परिसराचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे इथे पिलो लाव्हा पाहायला मिळतो. मुंबईतील काही लाव्हाप्रवाह पाण्याखाली वाहत होते, याचे पुरावे भूगर्भतज्ज्ञांना मिळाले आहेत. अशा प्रकारच्या लाव्हामध्ये स्पायलाइट नावाचे खडक तयार होतात. मुंबईत शिवडी आणि मालाडची कोराड डोंगरी येथे अशा प्रकारे लाव्हाची गोलसर उश्यांसारखी रचना पाहायला मिळते म्हणून त्याला या उशीसारख्या फुगीर रचनेमुळे पिलो लाव्हा म्हटले जाते. हा लाव्हा थंड पाण्यामुळे, एरवीपेक्षा वेगात थंड होतो. त्यातून येणारा वायू बाहेर निसटण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेस उशीसारखी किंवा फुग्यासारखी गोलाकार रचना तयार होते. अखेरीस एका बारीकशा छिद्रातून तो बाहेर निसटतो. या अशा लाव्हा रचनेमध्ये एका बाजूस ते बारीकसे छिद्रही व्यवस्थित पाहता येते. शिवडी आणि बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात एके ठिकाणी अशी रचना पाहायला मिळते. राष्ट्रीय उद्यानातून कान्हेरीच्या दिशेने जाताना मध्ये दहिसर नदीवरचा पूल पार करावा लागतो. या पुलाच्या खालच्या बाजूस ही पिलो लाव्हाची रचना व्यवस्थित दिसते. उन्हाळ्यात खाली उतरून ही रचना जवळून न्याहाळताही येते. मालाडला कोराड डोंगरीची रचना आता फारशी दृष्टीस पडत नाही.

माझगाव-डोंगरीचा भाग हाही महत्त्वाचा टेकडीचा भाग आहे. मुंबई विद्यपीठाच्या राजाबाई टॉवरवरून किंवा इतर कोणत्याही गगनचुंबी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून डोंगरी परिसर आजही स्पष्ट दिसतो. अगदी शीवच्या किल्ल्यावरूनही डोंगरीचा परिसर व्यवस्थित पाहता येतो. मात्र आता गगनचुंबी होत चाललेल्या मुंबईमुळे भविष्यात हे दृश्य पाहायला मिळणे तसे कठीणच असेल. कारण मोकळ्या झालेल्या कापड गिरण्यांच्या जमिनींवरच गगनचुंबी मुंबईला सुरुवात झाली आहे.

दक्षिण मुंबईतील आणि त्याचप्रमाणे मूळ मुंबई म्हणजे साष्टी बेटावरील अनेक टेकडय़ा नष्ट होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबईच्या पायाभरणीसाठी (रेक्लमेशन) त्याचा वापर करण्यात आला. त्याला एका वेगळ्या अर्थाने निमित्त ठरली ती अमेरिका. १८४६ मध्ये अमेरिकेत घटलेल्या कापसाच्या उत्पादनाशी मुंबईची सात बेटे जोडली जाण्याचा थेट संबंध आहे. अमेरिकेतील त्या घटीचा परिणाम ग्रेट ब्रिटनमधल्या मँचेस्टर आणि ग्लास्गो इथल्या कापड उद्योगावर झाला. ब्रिटिशांनी जगावर राज्य केले ते उद्योगाच्या बळावर. त्यातही कापड उद्योग. अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटल्याने तेथील वस्त्रोद्योग धोक्यात आला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. त्या वेळेस ज्या देशांमध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या ठिकाणी त्यांनी कापसाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या वेळेस भारतामध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या कापसाचे उत्पादन होते, हे त्यांच्या लक्षात आले. भारतातील बंदरांमधून इंग्लंडमध्ये कापूस कसा नेता येईल याचा विचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या वेळेस सुरत, बडोदा आणि मुंबई ही कापूस आणि वस्त्रोद्योग यांच्याशी संबंधित भारतातील महत्त्वाची ठिकाणे होती. मुंबई हे प्रमुख बंदर म्हणून विकसित करीत रेल्वेच्या अंतर्गत जाळ्याने बडोदा आणि सुरतला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बीबी अ‍ॅण्ड सीआय अर्थात बॉम्बे, बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे अस्तित्वात आली. त्या निर्णयाचा उल्लेख इंग्रजांच्या इतिहासात तात्काळ निर्णय’ असा करण्यात आहे. याची पूर्वतयारी

म्हणून मुंबईची सात बेटे जोडली जाणे आवश्यक होते. अशा प्रकारे ब्रिटिशांची ‘जागतिक गरज’ म्हणून मुंबईची सात बेटे जोडली गेली आणि दक्षिण मुंबई अस्तित्वात आली. त्यासाठी इथल्या टेकडय़ांचाच वापर पायाभरणीसाठी करण्यात आला!

विनायक परब  vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab

Story img Loader