मुंबई : मुंबई महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पातील भांडवली तरतुदींपैकी तब्बल ५२ टक्के रक्कम खर्च झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या खर्चाबाबत चर्चा सुरू झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या खर्चाबाबत शंका व्यक्त केली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत जेमतेम ४० टक्के खर्च होतो. यंदा एवढा खर्च झाल्याबद्दल त्यांनी समाजमाध्यमांवरून आक्षेप घेतला आहे. कंत्राटदारांना कामे सुरू करण्याआधीच निधी दिला जात असून त्यामुळे कंत्राटदारांचा फायदा होत असल्याचा आरोपही राजा यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चालू आर्थिक वर्षात मुंबई महानगरपालिकेने ५९ हजार ९५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये भांडवली कामांसाठी तब्बल ३६ हजार कोटींची तरतूद केली होती. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ३६ हजार कोटींच्या तरतुदींपैकी १८ हजार कोटी खर्च झाले. म्हणजेच ५२.२३ टक्के तरतूदी खर्च झाल्या आहेत. मात्र या आकडेवारीवर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला आहे. पालिकेने जो निधी खर्च केला त्याचे मूल्यमापन कोण करणार असा सवाल त्यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत सध्या निवडून आलेले नगरसेवक नाहीत. त्यामुळे या खर्चाबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र आपल्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत डिसेंबर अखेरपर्यंत कधीही खर्च ४० टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता. यंदा खर्चात एवढी वाढ कशी काय झाली असा सवाल त्यांनी केला आहे. महापालिकेची मुदत संपल्यामुळे सध्या पालिकेत प्रशासकांची राजवट आहे. त्यामुळे कोट्यवधींचे प्रकल्प कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केले जातात. पालिकेची मुदत संपलेली असल्यामुळे प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा : मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ

कंत्राटदारांना लाभ

कंत्राटदारांना गेल्या काही काळापासून काम सुरू करण्यापूर्वीची प्रारंभिक रक्कम दिली जात आहे. ही चुकीची प्रथा असल्याचा आरोपही राजा यांनी समाजमाध्यमांवरू केला आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारी रक्कम गोळा करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. मात्र पालिका प्रशासन कंत्राटदाराला आधीच रक्कम देऊन त्याच्या पैशांची बचत करीत आहे व पालिकेला मिळणाऱ्या व्याजावर पाणी सोडत आहे ,असा आरोप त्यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai former leader of opposition ravi raja suspects corruption in bmc expenditure mumbai print news css