मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांची कार अज्ञातांनी फोडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी दत्ता दळवींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आज दत्ता दळवींना अटक करण्यात आली. १२ डिसेंबरपर्यंत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यानंतर काही अज्ञातांनी संध्याकाळच्या सुमारास दत्ता दळवींची कार फोडली आहेत. या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत आक्रमक झाले आहेत.
सुनील राऊत यांनी काय म्हटलं आहे?
ज्यांनी दत्ता दळवींची कार फोडली ते शिंदे गटाचे नामर्द आहेत. गुपचूप जायचं आणि कार फोडायची हे नामर्दांचं काम आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत. आम्हाला नामर्दासारखं काम करता येत नाही. ते नामर्द आहेत म्हणून भाजपाचा आधार घेऊन मुख्यमंत्री झाले आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. ज्यावेळी शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून दत्ता दळवी शिवसेनेचं काम करत आहेत. जे नामर्द आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो. मी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शिंदे गटाचे नामर्द लोक आहेत. नामर्द होते म्हणूनच त्यांनी हे काम केलं. दत्ता दळवींना चुकीच्या पद्धतीने अटक केली. ज्यांचं सरकार आज आहे त्यांचं उद्या नसेल. आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा ज्यांनी चुकीची कारवाई केली त्यांना आम्ही सोडणार नाही.
असं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- Datta Dalvi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक झालेले दत्ता दळवी आहेत कोण?
काय घडला प्रकार?
ठाकरे गटाचे उपनेते दत्त दळवी यांच्या कारची तोडफोड होत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत चार अज्ञात तरुण हे दत्ता दळवींची कार फोडताना दिसत आहेत.
२६ नोव्हेंबरला काय घडलं?
भांडुपमध्ये २६ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांचं भाषण झालं. यावेळी दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतात, असं म्हणत एक शिवी दिली आणि हिंदूहृदयसम्राटचा अर्थ माहिती आहे का? आज आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदे यांना चाबकाने फोडून काढलं असतं, असं दत्ता दळवी म्हणाले होते. तसंच आजही ते आपल्या वक्तव्यावर ठाम होते. मी काहीही चुकीचं बोललो नाही, आनंद दिघे आज असते तर हेच म्हणाले असते असं आजही दत्ता दळवी म्हणाले. यानंतर संध्याकाळी त्यांची कार फोडण्याचा प्रकार घडला.