मुंबई : पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची कामे, बांधकामे आणि अन्य कारणांमुळे मागील काही वर्षात मुंबईतील अनेक परिसर प्रदूषित झाले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईत आजच्या घडीला भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्द हे विधानसभा मतदारसंघ प्रदूषित आढळले आहेत. असे असताना राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे मात्र या महत्त्वाच्या समस्येकडे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. प्रचारात हा प्रश्न उचलला जात नाही की राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यात प्रदूषणाचा मुद्दा मांडला जात नाही. त्यामुळे आता उमेदवारांनी आणि निवडणुकीत विजयी ठरणाऱ्या उमेदवारांनी या समस्येकडे लक्ष देत ही समस्या दूर करण्यासाठी लक्ष देण्याची मागणी मतदारांकडून होत आहे.
मुंबई शहरातील भायखळा आणि शिवडी नेहमीच चर्चेत असलेले मतदारसंघ सध्या हे अशुद्ध हवेसाठी देखील चर्चेत आले आहेत. याचबरोबर देवनार, मानखुर्द , गोवंडी, कांजूरमार्ग आणि वांद्रे -कुर्ला संकुल या भागात देखील गेली अनेक वर्ष प्रदूषणाच्या स्थितीत कोणातीही सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघ प्रदूषित झाले आहेत. शिवडी, भायखळा, मानखुर्द, देवनार हे विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक प्रदूषित आहेत. प्रदूषणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र या प्रश्नावर राजकीय पक्ष, उमेदवारांचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. शिवडी, भायखळा, मानखुर्द, देवनारमध्ये सध्या सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. यावेळी रस्ते, वाहतुकीच्या समस्येपासून पुनर्विकासाच्या समस्येपर्यंत, शिक्षण, आरोग्यापासून रोजगारापर्यंतच्या विषयावर आश्वासने दिली जात आहेत. पण महत्त्वाच्या अशा प्रदूषणाच्या विषयावर कोणीही बोलत नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचं वक्तव्य, “राज ठाकरेंच्या मनात काय ते मला..”
हेही वाचा – दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
देवनारमध्ये कचराभूमी आणि जैव वैद्याकीय कचऱ्यामुळे येथे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असतानाच आता गोवंडीतील रहिवाशी मुंबईतील वाईट हवेमुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे आणि बांधकामे त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात. मागील काही दिवस शिवडी येथील हवा निर्देशांक २००-३०० दरम्यान नोंदला गेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील २०१-३०० वाईट हवा समजली जाते. एकूणच प्रदूषणाचा हा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्षांनी आणि लोकप्रतिनिधींनी ठोस कृतीशील पावले उचलणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.