अंधेरी पूर्वेला एमआयडीसी परिसरात असलेल्या इंडसइंड बँकेच्या पहिल्या मजल्यावर गुरुवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आंतानु मोहनचेट्टा लाग (२५), राकेश बाबुलाल शिरकर (२४), रोहन रमाकांत तटकरे (२५) आणि सुधीर सुनील नाईक (२३) अशी मृतांची नावे आहेत. आग लागली त्या वेळेस पहिल्या माळ्यावर डेटा ऑपरेटिंगचे काम ४० ते ४५ कर्मचारी करीत होते. गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास एका ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना अचानक धूर आढळला. काही क्षणांतच पहिल्या मजल्यावरील कार्यालयाने पेट घेतला. खबरदारीसाठी कर्मचाऱ्यांनी वरच्या मजल्यांवर धाव घेतली आणि ते तेथे अडकले. इमारतीमधील अग्निसुरक्षा विभाग परिसराला टाळे असल्यामुळे त्यांना तेथे आसरा घेता आला नाही. त्यामुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील अकरा जखमींना सेवन हिल्स तर दोघांना होली स्पिरिट रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
आगीची वर्दी मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश हुजबंद घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री उशीरा आग विझविण्यात यश मिळविले. अग्निशमन दलाने शिडीच्या मदतीने तब्बल ४० कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. या आगीत आंतानु मोहनचेट्टा लाग (२५) आणि राकेश बाबुलाल शिरकर (२४) हे तरुण भाजल्यामुळे तर रोहन रमाकांत तटकरे (२५) आणि सुधीर सुनील नाईक (२३) हे तरुण गुदमरल्यामुळे मरण पावले. या इमारतीतील अग्निशमन दल यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याचे आढळून आले. याशिवाय व्हेन्टिलेशनही बंद असल्याची बाब उघड झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक हुजबंद यांनी सांगितले.