वांद्रे -कुर्ला संकुल(बीकेसी) येथील एका कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी(सीएफओ)तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी शुक्रवारी अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारदाराला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने सायबर भामट्यांनी सीएफओला संदेश पाठवून आठ लाख ५५ हजार रुपये बँक खात्यात हस्तांतरीत करण्यास सांगितले. रक्कम हस्तांतरीत केल्यानंतर सीएफओने विचारणार केली असता असा कोणताही संदेश त्यांना पाठवला नसल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई : पालिकेत पुन्हा उपायुक्तांची बदली
तक्रारदार नंदकिशोर गोयल(६२) विनती ऑरगॅनिक्स लि. या कंपनीमध्ये सीएफओ म्हणून काम करतात. त्यांना ३० ऑगस्टला दुपारी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला. संदेश पाठवणाऱ्याने आपण कंपनीच्या मालक विनती सराफ असल्याचे सांगितले. हा आपला नवीन मोबाइल क्रमांक असून तो कोणालाही देऊ नका, असे संदेशात नमूद करण्यात आले होते. आपण एका बैठकीत व्यस्त असून दूरध्वनी करू नका, असे संदेशात म्हटले होते. त्यानंतर त्याच क्रमांकावरून एका बँक खात्याचा क्रमांक देण्यात आला. त्या बँक खात्यात नऊ लाख ५० हजार ७०२ तातडीने हस्तांतरीत करण्यास गोयल यांना सांगण्यात आले. त्यानुसार गोयल यांनी टीडीएस कापून त्या बँक खात्यात आठ लाख ५५ हजार ६३२ रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर गोयल यांनी संदेश पाठण्यात आलेल्या क्रमांकावर दूरध्वनी केला. त्यावेळी कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्या क्रमांकावरून पुन्हा एक संदेश आला. त्यात आणखी बँक खात्यांची माहिती देण्यात आली होती. त्यावरही रक्कम पाठवण्यास सांगण्यात आले होते. गोयल यांना संशय आल्यामुळे त्यांनी रक्कम पाठवली नाही व त्या क्रमांकावर पुन्हा दूरध्वनी केला. पण मोबाइल उचलला नाही. अखेर गोयल यांना त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक विनंती सराफ यांनी कामासंदर्भात बोलवले. त्यावेळी गोयल यांनी त्यांना पैसे पाठवण्याबाबतच्या संदेशाबाबत विचारणा केली.
हेही वाचा >>> मुंबई : एसटीतील कंत्राटी चालकांची नियुक्ती रद्द
त्यावेळी त्यांनी आपण कोणतेही संदेश पाठवले नसल्याचे सांगितले. तेव्हा गोयल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पाठवलेले पैसे गोठवण्यासाठी त्यांनी बँकेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण रक्कम हस्तांतरीत झाली होती. त्यानंतर गोयल यांनी मंगळवारी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ (तोतयागिरी), ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६(क) (ओळख चोरी) आणि ६६(ड) (संगणक संसाधनाचा वापर करून व्यक्तिमत्वाद्वारे फसवणूक) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बँकेला पत्र लिहून रक्कम हस्तांतरीत झालेल्या बँक खात्याचा तपशील मागवला आहे.