गुंतवणुकीवर १० ते १५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षांच्या तरुणीची सुमारे पावणेदोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीच्या तक्रारीवरून साकिनाका पोलिसांनी अनोळखी भामट्याविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करीत आहेत.
तक्रारदार तरुणी ही साकिनाका येथील असल्फा गाव परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास असून ती विक्रोळी येथे नोकरी करते. ८ ऑगस्टला ती तिच्या घरी होती. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर एक नोकरीविषयी जाहिरात पाहिली. घरबसल्या नोकरीद्वारे गुंतवणूक करून १० ते १५ टक्के व्याज मिळावा असे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. तिने जाहिरातीवर असलेली लिंक उघडली. यावेळी तिला नोंदणी करण्यास सांगण्यात आले. नोंदणी केल्यानंतर तिने या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
दर महिन्याला मिळणाऱ्या वेतनातून तिने काही पैसे बचत केले होते. तिला पाठवलेल्या लिंकवर गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्यात देण्यात आले होते. त्यात गुंतवणूक करून वस्तू खरेदी केल्यानंतर तिला काही काळातच व्याजाची रक्कम मिळाली होती. अशा प्रकारे तिने दोन-तीन वस्तू खरेदी केल्या होत्या. या सर्व वस्तूवर तिला व्याजाची रक्कम मिळाली होती. त्यामुळे तिला विश्वास बसला. जास्त व्याजदर मिळेल म्हणून तिने या वस्तूंवर सुमारे पावणेदोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र नंतर तिला व्याजाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तिने गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळावी यासाठी वारंवार संबंधितांशी संपर्क साधला. मात्र तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेनंतर तिने साकिनाका पोलिसांत तक्रार केली. आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पडून तिच्या पावणेदोन लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर साकिनाका पोलिसांनी अनोळखी भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.