मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. बीकेसी – कफ परेड दरम्यानचा दुसरा टप्पा केव्हा वाहतूक सेवेत दाखल होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. मुंबईकरांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मात्र बीकेसी – कफ परेड नव्हे तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी असा टप्पा मार्च २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.
टप्पा २ अ मध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार असून या टप्प्याचे संचलन सुरू झाल्यास मुंबईकरांना आरे – आचार्य अत्रे चौक असा थेट भुयारी प्रवास करता येणार आहे. तर दुसरीकडे आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्पा २ ब जून २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) नियोजन आहे.
हेही वाचा – अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
ही संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा एमएमआरसीकडून केला जात आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर बीकेसी – कफ परेड मार्गिकेचे काम पूर्ण करून या मार्गिकेचे संचलन सुरू करण्याचे उद्दीष्ट एमएमआरसीचे आहे. त्यानुसार या मार्गिकेच्या कामाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत बीकेसी – कफ परेड मार्गिकेचे ८८.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, कफ परेडपर्यंतचा टप्पा मार्च २०२५ मध्ये पूर्ण करून मे २०२५ पर्यंत भुयारी मेट्रो कफ परेडपर्यंत धावेल असे सांगण्यात आले होते. पण आता मात्र मार्च २०२५ पर्यंत बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल आणि आरे – आचार्य अत्रे चौक अशी भुयारी मेट्रो धावेल.
आरे – बीकेसी, बीकेसी – वरळी आणि वरळी – कफ परेड अशा तीन टप्प्यांत भुयारी मेट्रो वाहतूक सेवेत दाखल केली जाईल असे काही महिन्यांपूर्वी एमएमआरसीकडून जाहीर करण्यात आले होते. यात बदल करून आता आरे – बीकेसी आणि बीकेसी – कफ परेड असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता मात्र यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता टप्पा २ अ अंतर्गत बीकेसी – आचार्य अत्रे टप्पा, तर टप्पा २ ब अंतर्गत आचार्य अत्रे – कफ परेड टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.
आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्प्यासाठी जूनपर्यंतची प्रतीक्षा
टप्पा ‘२ अ ’चे काम वेगात सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. तर मार्च २०२५ मध्ये बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा ‘२ अ ’ वाहतूक सेवेत दाखल होईल. टप्पा ‘२ अ ’ वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंत टप्पा ‘२ ब’ चे काम पूर्ण करून हा टप्पा जून २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल केला जाईल – अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी