मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्य सरकारच्या १० पैकी एक जी.टी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार नवे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारकडून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील पहिली तुकडी महिनाभरामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे जी.टी. रुग्णालयाच्या परिसतरातील नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्या तुकडीतील ५० विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. स्वातंत्र्यानंतरचे मुंबईतील हे पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे.
जी.टी. रुग्णालय व कामा रुग्णालय यांचे एकत्रित सुरू होणाऱ्या दक्षिण मुंबईतील नव्या वैद्यकीय महविद्यालयात विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. जी.टी. रुग्णालयात आपत्कालीन रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी अपघात विभागाच्या शेजारीच आपत्कालीन विभाग सुरू करण्यात आला आहे. अपघात विभागात आलेल्या आपत्कालीन रुग्णावर नेमक्या कोणत्या विभागाअंतर्गत उपचार करायचे हे निश्चित होईपर्यंत त्याच्यावर आपत्कालीन विभागात उपचार करण्यात येणार आहेत. तसेच सीटी स्कॅन विभाग सुरू करण्यात आला असून, एमआरआय यंत्र खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. दोन महिन्यांमध्ये एमआरआयची सुविधा सुरू होईल. सोनोग्राफी, क्ष किरण सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे. महिलांच्या छातीमधील गाठीच्या तपासणीसाठी ‘आय ब्रेस्ट’ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे.
वैद्यकशास्त्र विभाग, शस्त्रक्रिया विभाग, स्त्रीरोग विभाग, लहान मुलांचे विभाग, कान – नाक – घसा विभाग, नेत्रविभाग, त्वचारोग विभाग, मानसोपचार तज्ज्ञ विभाग, दंत विभाग अद्ययावत करण्यात येणार आहेत. हृदयरोग, कर्करोग आणि मज्जातंतूशास्त्र विभागाचे अतिविशेषोपचार विभाग सुरू करण्याचा विचार आहे. प्रयोगशाळा, ग्रंथालय, सभागृह, वसतिगृह, उपहारगृह, वर्गखोल्या सज्ज करण्यात आल्या आहेत.
नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयासाठी १४६ नवीन पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध होऊन रुग्णांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रयत्नाने आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने सुरू होत असलेल्या या महाविद्यालयात सर्व अद्ययावत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक दिलीप म्हैसेकर, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याची माहिती जी. टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. विद्यार्थिनींसाठी नर्सिंग इमारतीमधील २० खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची व्यवस्था जुन्या डॉक्टर वसतिगृहामध्ये केली आहे.
जी.टी. व कामा रुग्णालयात हाेणार वर्ग
विद्यार्थ्यांच्या नियमित वर्गासाठी जी.टी व कामा रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये एमबीबीएसच्या पहिल्या दोन वर्षांचे वर्ग कामा रुग्णालयामध्ये तर पुढील दोन वर्षांचे वर्ग जी.टी. रुग्णालयामध्ये होणार आहेत.
२० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू
सध्या जी. टी. रुग्णालयामध्ये १० खाटांचा अतिदक्षता विभाग असून, तो वैद्यकशास्त्र विभागासाठी वापरला जातो. त्यामुळे शस्त्रक्रिया विभागासाठी अन्य १० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे.