गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या घोषणा देत मुंबईतील भाविकांनी आज गणरायाला निरोप दिला. मुंबईतील मानाच्या समजल्या जाणा-या लालबागच्या राजाचे आज सकाळी ८ वाजता विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विघ्नहर्त्यां गणरायाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात न्हाऊन निघाली होती. मुंबईच्या लालबाग परिसरात गणेश भक्तांचा महापूर लोटला होता. भक्तगण मोठ्या जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते.
ढोल-ताशे आणि श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळाकडून गणरायाच्या मृर्तींवर होणारी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी लालबाग परिसरात दाखल झाली होती.
सकाळी गणेश गल्लीतील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात सुरूवात झाली. त्यापाठोपाठ अवघ्या मुंबापुरीचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला मोठ्या थाटात सुरुवात झाली. यावेळी मुंबईतील जुहू, गोराई, गिरगाव चौपाट्यांवर आपल्या घरगुती गणपतींना मुंबईकरांनी भावपूर्ण निरोप दिला.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्याच्या तयारीत शनिवारी सायंकाळपासून भाविक व्यग्र होते, तर विसर्जन सोहळ्यास कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली होती मुंबईत ४७ हजार पोलिसांचा खडा पाहारा ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्या १०, तर सीमा सुरक्षा दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या.
सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, एनएसएसचे स्वयंसेवक, छात्रसैनिक अशा सुमारे १०,५०० जणांची फौज विसर्जनस्थळांवर कार्यरत होत्या. या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी समाजकंटकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यानुसार अंमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्या ६९०, तर अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
गणरायाच्या नादात दुमदुमली मुंबापुरी
मुंबईतील मानाच्या समजल्या जाणा-या लालबागच्या राजाचे आज सकाळी ८ वाजता विसर्जन करण्यात आले.
First published on: 08-09-2014 at 09:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ganesh visarjan