गणेशोत्सव काळात कोकणमार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीसाठी निर्बंध घालण्यात आले असून वाळूची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीचा ओघ लक्षात घेता या मार्गावर जिल्ह्याच्या स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त दोन पोलीस अधीक्षकांसह पाचशेहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात कोकणातून जाणाऱ्या महामार्गावर मोठा ताण पडतो. या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग १७ वरील सुमारे पाचशे किलोमीटर अंतरात दोन पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक, ७ निरीक्षक, ५० उपनिरीक्षकांसह साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तर १६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यत अवजड वाहने, ट्रेलर, वाळू यांच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बिघडलेल्या वाहनांना मदत मिळावी यासाठी परिसरातील सर्व गॅरेज चालकांना बैठका घेऊन सूचना करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडीत कुणी अडकल्यास त्यांना खाद्यपदार्थची सोय करण्याची विनंती महसूल विभागाला करण्यात आली आहे.
महामार्गावरील वाहतुकीचा ताण टाळण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एखादे वाहन रस्त्यात बंद पडल्यास त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी क्रेन, गॅस कटर, मेकॅनिक आदींची व्यवस्था करण्यात आली असून अपघात घडल्यास मदतीसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे. परिसरातील रुग्णालये, त्यांचे नंबर नियंत्रण कक्षासह बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनाही देण्यात आले आहेत. मुंबईतल्या विशेष नियंत्रण कक्षात कोकणातील रस्त्यांची माहिती असणारे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आल्याची माहीती पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर व अपर पोलीस महासंचालक (वाहतुक)विजय कांबळे यांनी सोमवरी पत्रकार परिषदेत दिली.
महामार्ग पोलिसांचे टोल फ्री क्रमांक
९८३३४ ९८३३४
९८६७५ ९८६७५
एसएमएस मोबाईल क्रमांक
९५० ३२ १११ ००
९५० ३५ १११ ००

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा