मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान पाच मुलं समुद्रात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. वर्सोवा जेट्टी येथे रविवारी (१९ सप्टेंबर) गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरलेले पाच जण समुद्रात बुडाले आहेत. त्यापैकी, दोन मुलं बचावली आहेत तर, तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) रविवारी याबाबतची माहिती दिली आहे.
समुद्रात बुडालेल्या पाच जणांपैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर उर्वरित तिघांचा मुंबई अग्निशमन दल शोध घेत आहे. बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. बीएमसीने रविवारी याबाबतचं ट्विट केलं आहे. या घटनेनंतर, मुंबईतील गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं म्हटलं जात आहे.
Maharashtra | Locals came without permission as there were restrictions on immersion at Versova beach. Our team came with a doctor to rescue drowned children. Two were rescued &given first aid &sent to hospital. Resue operation for 3 others underway: Police Naik Manoj W Pohanekar pic.twitter.com/SIUDPRbJwz
— ANI (@ANI) September 19, 2021
“ही विसर्जनासाठी ठरवून दिलेली जागा नव्हती. आम्ही लोकांना इथे गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यावर बंदी घातली होती. मात्र, तरीही अनेक जण इथे दाखल झाले”, असं वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज वामन पोहाणेकर यांनी सांगितलं आहे. “या शोध मोहिमेसाठी नौदलाचे डायव्हर्स आणि पोलिसांच्या बोटीची मदत घेण्यात आली आहे”, अशी माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.