मुंबई : महापालिकेतर्फे नाल्यांमधील तरंगणारा कचरा काढल्यानंतर, अनेक भागांत नियमितपणे नालेसफाई केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यावर कसे नियंत्रण ठेवावे असा संभ्रम आता पालिका प्रशासनाला सतावू लागला आहे.
मुंबईकर नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग अव्याहतपणे काम करत आहे. नाल्यातून गाळ उपसण्याचे आणि कचरा बाहेर काढण्याचे काम नियमितपणे सुरू आहे. नाल्यांमध्ये कचरा साचणे थांबवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवते. नाल्यांमध्ये येणाऱ्या कचरा अडवण्यासाठी छोट्या नाल्यांवर जाळ्या लावता येतील का, अथवा नाले बंदिस्त करता येतील का, तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का, याबाबतची चाचपणी महापालिका प्रशासन करत आहे. प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. नालेसफाईच्या माध्यमातून दोन प्रकारची कार्यवाही केली जाते. त्यात नाल्यातून गाळ काढणे आणि नाल्यातील पाण्यावर तरंगणारा घनकचरा काढणे या प्रमुख दोन कार्यवाहींचा समावेश आहे. नाल्यातून गाळ काढण्याची कार्यवाही जवळपास पूर्णत्वास पोहोचली आहे. मात्र, सफाई झालेल्या नाल्यातील पाण्यावर कचरा साचलेला आढळून येत आहे. मुंबईतील नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार तरंगता कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कचऱ्यात थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स आदी विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तूंचा (फ्लोटिंग मटेरिअल) समावेश आहे.
हेही वाचा – म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ११ जूनला ई लिलाव
हेही वाचा – मुंबई : मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरुन आतापर्यंत दहा कोटी प्रवाशांचा प्रवास
प्लास्टिक वापरास बंदी असूनही नागरिक नाल्यांमध्ये प्लास्टिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यासह भरतीच्या काळात नाल्यातून तरंगणारा कचरा आणि गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वय साधून हा तरंगता कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, या दृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू व तत्सम कचरा नाल्यांमध्ये किंवा गटारांमध्ये टाकू नये. नाल्याच्या नजीकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनीही नाल्यात कचरा न टाकता कचराकुंड्याचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.