एकीकडे मोकळ्या जागांची कमतरता आणि जिथे मोकळ्या जागा आहे, हिरवाई आहे त्या बागाही सुरक्षेच्या कारणासाठी फक्त सकाळी आणि संध्याकाळी अवघ्या दोन – तीन तासांसाठी खुल्या.. मुंबई महानगरीतील हा विरोधाभास आता दूर झाला आहे. शहरातील बागांची उपलब्धता व वेळा याबाबत पर्यावरण अभ्यासक ऋषी अगरवाल यांनी केलेल्या अहवालावर सकारात्मक विचार करून महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे.
प्रत्येक माणसामागे दहा ते १२ चौरस मीटर मोकळी जागा असणे अपेक्षित आहे. मात्र मुंबईत हे प्रमाण अगदी कमी आहे. प्रत्येक माणसाला या शहरात कशीबशी १.१ चौरस मीटर जागा मिळते. त्यातही या जागेचा आनंद केवळ पहाटे किंवा संध्याकाळी सूर्य कलायला लागल्यावरच मिळतो. शहरातील महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या हजाराहून अधिक बागा या पहाटे सहा ते नऊ आणि संध्याकाळी चार ते सात हा वेळेतच खुल्या राहत. प्रचंड गर्दी, कामाचा तणाव व मोकळ्या जागांची कमतरता असलेल्या शहरातील प्रत्येकाला सकाळी किंवा संध्याकाळी बागेत जाणे शक्य नसते. गृहिणी, वृद्ध तसेच कार्यालयात केवळ दुपारच्या जेवणाचा वेळ मिळत असलेल्या कर्मचाऱ्यांना दुपारची वेळ सोयीची असते. मात्र गर्दुर्ले तसेच समाजकंटकांपासून सुरक्षितता मिळण्याच्या उद्देशाने तसेच स्वच्छता व देखभालीसाठी बागांमध्ये सर्वसामान्यांनाच प्रवेश नाकारला जात असे. या परिस्थितीचा अभ्यास करून ऋषी अगरवाल यांनी ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून जुलैमध्ये अहवाल प्रसिद्ध केला.
जुगारी, गर्दुल्ले तसेच जोडपी, दुपारी जेवणासाठी तसेच वामकुक्षीसाठी येणाऱ्यांमुळे बाग असुरक्षित व अस्वच्छ होते तसेच दुपारी बागा बंद राहिल्यावर साफसफाई करणे सोयीचे पडते, असे स्पष्टीकरण काही बाग व्यवस्थापकांकडून देण्यात आले होते. मात्र दक्षिण मुंबईत अतिशय रहदारीच्या रस्त्यालगत असलेल्या क्रॉस मैदान तसेच हॉर्निमन सर्कल ही दोन्ही ठिकाणी दुपारच्या वेळीही सर्वांसाठी खुली असतात. या बागांमध्ये अनेकजण झाडांच्या सावलीखाली झोपतातही, मात्र त्याने बागेचे नुकसान होत नाही तसेच योग्य नियोजन केल्यास सुरक्षा व देखभालीची समस्या येत नाही असे या दोन्ही बागांच्या व्यवस्थापकांनी सांगितले होते. त्यामुळे इतर बागांनीही त्याप्रमाणे नियोजन करून मुंबईकरांना अधिकाधिक वेळ हिरवाईचा मार्ग मोकळा ठेवावा, असे अहवालात म्हटले होते.
या अहवालाच्या प्रकाशनासाठी आलेल्या अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांनी बागांची ही कोंडी मान्य केली व त्यावर लवकरात लवकर उपाय योजण्याचेही आश्वासन दिले. पालिकेच्या बागा देखभालीसाठी खासगी संस्थांकडे देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे वॉर्ड अधिकारी, उद्यान विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा करून बागांच्या वेळा काही काळासाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील सुमारे ७० टक्के बागा यापद्धतीने सध्या सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र हा प्रयोग असून समस्या हाताबाहेर गेल्यास पुन्हा विचार केला जाईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सुरक्षेचे तसेच देखभालीच्या समस्या सोडवून दुपारीही या बागा खुल्या ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील दोनशेहून अधिक बागा काळजीवाहू तत्त्वावर खासगी संस्थांकडे देण्यात आल्या आहेत. त्यांनाही या बागा दिवसभर खुल्या ठेवण्याची अट घालण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिले.

Story img Loader