अंधेरीतील एका पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर ओशिवरा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा घातला. या पार्टीत अंमलीपदार्थाचे सेवन सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चार उच्चपदस्थ परदेशी तरुणांसह एकूण ३२ जणांना अटक केली. या पार्टीत १२ तरुण समलिंगी (गे) असल्याचे आढळले.
अंधेरीच्या ‘चेझ मोई पब’मध्ये एक अंमलीपदार्थाचा तस्कर अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. शुक्रवार मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास पोलीस पथकाने या पबवर छापा घातला. यावेळी पार्टीतील तरुण-तरूणी मद्यधुंद अवस्थेत आक्षेपार्ह कृत्य करताना आढळले. पोलिसांनी पार्टीतील ३२ जणांना अटक केली. त्यात अमेरिकन वकिलातीत काम करणाऱ्या तिघांचा समावेश आहे. चार तरुणींपैकी एक डॉक्टर, एक तरुणी नौदल अधिकाऱ्याची मुलगी तर दोन महाविद्यालयीन तरुणी होत्या. पोलिसांनी २९ जणांना दंडात्मक कारवाई करुन सोडून दिले. मात्र चरस बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक केली. पार्टीत १२ गे तरुण सहभागी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या पार्टीत प्रथमच पोलिसांनी ‘स्पीड’ नावाचे अ‍ॅसिडसारखे पेय मिळाले. पोलिसांनी या पेयाच्या बाटल्या जप्त केल्या असून त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. पब मालकाकडे पार्टीचा परवाना नसल्याचे आढळल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले. एसएमएस आणि फेसबुकच्या माध्यमातून या पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते.

Story img Loader