केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत अत्यंत वेगळ्या धाटणीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकरांसाठी वातानुकूलित रेल्वेगाड्यांची घोषणा केली. कोणत्याही लोकप्रिय घोषणा किंवा नवीन गाड्यांची घोषणा करण्याच्या परंपरेला फाटा देत या अर्थसंकल्पात प्रभू यांनी रेल्वे तिकीटांचे दर ‘जैसे थे’ ठेवत सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासाही दिला. याशिवाय, मुंबई-दिल्ली मार्गासह नऊ नव्या रेल्वेमार्गांवर २०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या हायस्पीड गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. तर दुसरीकडे,बहुचर्चित अशी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असून या प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील चाचपणी सुरू असल्याचे प्रभू यांनी  सांगितले. तब्बल १६ वर्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी महाराष्ट्रातील व्यक्ती विराजमान झाल्याने मुंबईसह संपूर्ण राज्याला सुरेश प्रभू यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मोजक्याच घोषणा करून अनेकांना संभ्रमात टाकले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून, याअंतर्गत महिलांच्या डब्यात आणि मुंबईतील उपनगरीय स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा धागा पकडून  आगामी काळात रेल्वेतील स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येणार आहे. तर सर्वसामान्यांसाठी रेल्वेच्या जनरल डब्यात मोबाईल चार्जिंगची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे वातानुकूलित गाड्यांची घोषणा वगळता यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने मुंबईकरांच्या पदरात फार काही दिलेले नाही.
महाराष्ट्राचा विचार करता या अर्थसंकल्पात ठोस अशा तरतुदी दिसून आल्या नसल्या तरी, आगामी तीन वर्षांच्या काळात  कोकणात रेल्वेच्या माध्यमातून ५०००० रोजगारांची निर्मिती केली जाणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.

रेल्वे अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी पुढीलप्रमाणे: 

* रेल्वेमध्ये नोकरीसाठी आज ऑनलाईन अर्जभरती, कोकण रेल्वेत तीन वर्षांत ५० हजार रोजगार देणार
* स्टेशन, रेल्वेगाड्यांना कंपन्यांची नावे देऊन पैसा उभारणार
* एमयूटीपीतंर्गत मुंबईला ८ हजार ५०० कोटी मिळणार
* मुंबई लोकलच्या एमयूटीपी ३ ची घोषणा, यामध्ये ६ मोठ्या प्रकल्पांचा समावेश
* पनवेल – कर्जत दुपदरीकरणासाठी १ हजार ५६१ कोटींची तरतूद
* ऐरोली – कळवा उन्नत मार्गासाठी ४२८ कोटीची तरतूद
* विरार –डहाणू चौपदीकरणासाठी ३५५५ कोटी
* लोकलच्या कोचेससाठी ५६५ कोटीची तरतूद
* रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी १९५० कोटी
* ट्रेसपास कंट्रोलिंगसाठी ५२० कोटी
* प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नाही
* तिकीट चार महिने आधी उपलब्ध होणार
* मुंबईत लवकरच वातानुकूलित लोकल
* जनरल डब्ब्यात मोबाईल चार्जिंग, ए आणि बी दर्जाच्या स्टेशनवर वाय-फाय
* हेल्पलाईन नंबर १३८, रेल्वेसंदर्भात माहिती, तक्रारींसाठी मोबईल अॅप
* स्टेशन आणि रेल्वे स्वच्छतेसाठी नवा विभाग
* मानवविरहित फाटकांवर अलार्मची सोय
* रेल्वेतील महिलांच्या डब्ब्यात सीसीटीव्ही
* देशातील चार विद्यापीठांमध्ये रेल्वे संशोधन अभ्यासक्रम

Story img Loader