मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील एक फरार आरोपी सिद्दिकी ताजुल इस्लाम काजी अभिनुद्दीन याला मुंबई गुन्हे शाखेने हैदराबाद येथून अटक केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो फरार होता. नाव बदलून तो हैदराबादच्या एका कपंनीत महिना साठ हजार रुपये पगारावर काम करत होता.
 २००२ साली घाटकोपर पश्चिम येथे एका बसमध्ये स्फोट झाला होता. त्यात ४ जण ठार आणि ३२ जण जखमी झाले होते. त्याप्रकरणी सिद्दिकी पोलिसांना हवा होता. त्याच्याविरोधात पोलिसांनी विशेष पोटा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सिद्दिकी हा मूळचा औरंगाबादचा आहे. या स्फोटातील मास्टर माइंड डॉ. अब्दुल मतीन शेख यांच्या गटात सिद्दिकी कार्यरत होता. पोलिसांनी या प्रकरणात एकूण १३ जणांवर दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यातील ५ जण फरार होते. सिद्दिकीसुद्धा फरार असल्याने त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. घाटकोपर स्फोटातील ८ आरोपींना पोटा न्यायालयाने २००५ मध्ये निर्दोष सोडले होते. त्यांच्याविरोधात सरकारने उच्च न्यायायालयात दाद मागितली आहे.