Ghatkopar Hoarding Accident Update: मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात ही घाबरवणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे भीषण झाली होती. सोमवारी १३ मे ला अवकाळी पावसाचा तडाखा मुंबापुरीला बसला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, पालघर सह विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली होती. कडक उन्हाळ्यात आलेला हा पाऊस खरंतर मुंबईकरांचा त्रास कमी करेल अशी अपेक्षा होती पण ठिकठिकाणी झालेल्या भीषण दुर्घटनांमुळे आनंदाला गालबोट लागले असे म्हणता येईल. मुंबईतील घाटकोपर भागात पंत नगर येथे याच वादळी वाऱ्यांमुळे एक भलेमोठे लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले होते. तब्बल १४ जणांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेतील होर्डिंगविषयी आता मुंबई महानगरपालिकेकडून नवीन माहिती दिली गेली आहे.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेलं होर्डिंग
दुर्घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक निवेदन जारी करून हे जाहिरात फलक त्यांच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. BMC ने जारी केलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती. हे होर्डिंग सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोठे असून याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद केली गेली होती.
बीएमसीने काय सांगितलं?
मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घनटास्थळी चार होर्डिंग्स होत्या. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी/एनओसी एजन्सी/रेल्वेकडून घेण्यात आली नव्हती.”
बिलबोर्ड बांधणाऱ्या M/S Ego Media या एजन्सीविरुद्धही तक्रार नोंदवण्यात आली होती व बीएमसीसुद्धा त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली होती. बीएमसी जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे
बीएमसी आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, “हे एक बेकायदेशीर होर्डिंग होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रेल्वेच्या जमिनीवर चार होर्डिंग उभारण्यात आले होते आणि त्यापैकी एक कोसळले आहे. बीएमसी वर्सभरापासून होर्डिंग्ज लावण्यावर आक्षेप घेत होती.यापूर्वी १९ मे २०२३ ला संबंधित होर्डिंगसाठी छेडा नगर जंक्शनजवळील आठ झाडांना पावडर घालून विषबाधा करत पाडण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी सुद्धा बीएमसीने एफआयआर दाखल केली होती. “