मुंबई : घाटकोपर येथील छेडा नगरमधील पोलीस वसाहतीनजीकच्या पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळे संपूर्ण मुंबई हादरली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकातील (एनडीआरएफ) जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेत जीवाची बाजी लावत ८९ जणांना बाहेर काढले. पेट्रोल पंपावर दुर्घटना घडल्यामुळे आगीच्या ठिणग्या उडण्याची शक्यता असलेल्या कुठल्याही यंत्राचा वापर न करता केवळ मनुष्यबळ आणि क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य हाती घेण्यात आले. तळपते ऊन, घामाच्या धारा, कोंदट वातावरणात मंगळवारी जवानांच्या संयमाची कसोटी लागली. जाहिरात फलकाच्या लोखंडाच्या सांगाड्याखाली प्रवेश करत एनडीआरएफच्या जवानांनी अनेकांचे प्राण वाचविले.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन तात्काळ एनडीआरएफचे दुसऱ्या पथकालाही बचावकार्यासाठी बोलाविण्यात आले. लोखंडी सांगाड्याखाली दबल्या गेलेल्या काही गाड्यांमधून पेट्रोल, डिझेलची गळती झाली होती. त्यामुळे आगीच्या ठिणग्या उडणाऱ्या कुठल्याही यंत्राचा वापर केल्यास जीवावर बेतण्याची शक्यता होती. मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या सल्ल्याने क्रेन मागविण्यात आल्या. घटनास्थळी २५० आणि ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेन तैनात करण्यात आल्या. क्रेनच्या साहाय्याने मंगळवारी रात्री दोन्ही बाजूने जवळपास ४ फुटापर्यंत लोखंडी सांगाडा उचलण्यात आला. जीव मुठीत घेऊन जवळपास १०० मीटर आत जाऊन एनडीआरएफच्या जवानांनी अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. रात्रभर काळोखात अवितरतपणे बचावकार्य सुरू होते. केवळ क्रेन आणि मनुष्यबळाने हे बचावकार्य करण्यात आले. लोखंडी सांगाड्याची दुसरी बाजू उचलण्यासाठी मंगळवारी सकाळी क्रेन दुसऱ्या बाजूला नेण्यात आल्या. मात्र, पुरेशा जागेअभावी एकाच क्रेनचा वापर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी अविरतपणे बचावकार्यात सहभागी झाले होते.
हेही वाचा : सलमान खान गोळीबार प्रकरण : हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक
क्रेन स्थापित करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास लागत असल्यामुळेही बचावकार्यात विलंब झाला. दरम्यान, मनुष्यबळाच्या साहाय्याने सांगड्याच्या बाहेरील परिसरात जवानांनी बचावकार्य सुरू ठेवले. मात्र, होर्डिंगच्या लोखंडी सांगड्याचे वजन क्रेनच्या क्षमतेपेक्षा अधिक होते. पाऊस पडून गेल्यामुळे होर्डिंगच्या खालील भागात पाणी साचले होते. बचावकार्यादरम्यान अनेक जवानांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, बचावकार्य सुरूच होते.
एनडीआरएफच्या प्रशिक्षणात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनविले जाते. त्यामुळे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही बचावकार्य करताना ताण आला नाही. लोखंडी सांगाडा कोणत्याही क्षण कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे सावधगिरी बाळगूनच त्याखाली जात होतो. सांगाड्याखाली पुरेशा प्रमाणात प्राणवायू नव्हता. दुर्गंधीमुळे जीव नकोसे झाले होते. यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले, अशी माहिती एनडीआरएफचे मुख्य हवालदार विजय पाटील यांनी दिली.
हेही वाचा : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पुढील तीन तासांत वादळी पावसाची शक्यता
हायड्रोलिक क्रेनच्या साहाय्याने सोमवारी रात्रीपर्यंत होर्डिंगचे ३ गर्डर उचलण्यात आले. त्यांनतर, एनडीआरएफच्या जवानांनी होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्याच्या आत शिरून बचावकार्य केले. पेट्रोल पंप असल्यामुळे पुरेशा यंत्रांचा वापर करता आला नाही. त्यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक ठरले, असे एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोलकर यांनी सांगितले.
फलक हटवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार
एनडीआरएफ जवान, अग्निशमन दल आणि काही तज्ज्ञांनी सल्लामसलतीअंती हा फलक उचल्याण्याचा प्रयत्न केला. यासाठी मोठ्या क्रेन मागवण्यात आल्या होत्या. गॅस कटरच्या साह्याने हा फलक तोडण्याचा विचार होता. मात्र पेट्रोल पंपावरील पेट्रोल, डिझेलचा साठा लक्षात घेता गॅस कटरचा वापर धोकादायक ठरण्याची शक्यता होती. तूर्तास हा फलक तोडण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण फलक हटवण्यासाठी दोन दिवस लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.