मुंबईतल्या घाटकोपरमध्ये बुधवारी म्हणजेच ८ मार्चला एक विवाहित जोडपं त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळलं. या दोघांचेही मृतदेह त्यांच्याच घरातल्या बाथरूममध्ये सापडले. या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईत्या घाटकोपर या ठिकाणी झालेली ही घटना आहे. घाटकोपरच्या पंतनगर भागात असलेल्या कुकरेजा टॉवरमध्ये हे दाम्पत्य मृतावस्थेत आढळलं होतं. आता पोलिसांच्या हाती एक माहिती लागली आहे. मात्र त्यामुळे दीपक शाह आणि रीना शाह या दोघांच्याही मृत्यूचं गूढ वाढलं आहे.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास छेडा नगर जंक्शनपासून म्हणजेच रीना आणि दीपक यांच्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हे दोघं दिसले होते. रात्री ९.३० पर्यंत ते कुठे होते ते समजू शकलेलं नाही. आता पोलिसांपुढे हे सहा तास हे दोघंही कुठे होते हे शोधण्याचं आव्हान आहे. याचाच शोध घेण्यासाठी दोन पथकंही तयार करण्यात आली आहे.
बुधवारी काय घडलं?
रीना शहा आणि दीपक शहा यांच्याकडे काम करण्यासाठी येणारी गृहसेविका त्यांच्या घरी दुपारी १२ च्या दरम्यान आली. तिने बेल वाजवली पण कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर तिने रीना यांचा नंबरही डायल केला. तिला मोबाइल वाजत असल्याचं बाहेर ऐकू येत होतं पण कुणीही फोन उचलत नव्हतं आणि दारही उघडत नव्हतं. तिला या बाबत काळजी वाटली त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या गृहसेविकेने दीपक यांच्या आई कांताबेन यांना फोन केला अशी माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे. कांताबेन यांना फोन केल्यानंतर हा प्रकार पोलिसांनाही कळवण्यात आला. पोलिसांनी घरात जाऊन पाहिलं तेव्हा या दोघांचे मृतदेह बाथरूममध्ये आढळून आले. दीपक शाह आणि त्यांची पत्नी रीना या दोघांचे मृतदेह बाथरूममध्ये नग्नावस्थेत आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाथरूममधला शॉवर बंद होता. घटनास्थळी डॉक्टरही पोहचले होते. त्यांनी हे पाहिलं की रीना आणि दीपक यांची नाडी लागत नाही. त्यांना तातडीने हे दोन्ही मृतदेह राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केलं. पंतनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी ही माहिती दिली आहे. सावंत पुढे म्हणाले की या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदनही करण्यात आलं आहे. मात्र डॉक्टरांना या दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही. या दोघांचाही व्हिसेरा घेण्यात आला आहे कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये तो पाठवण्यात आला आहे.
मृत्यूची पाच कारणं असू शकतात असं फॉरेन्सिक तज्ज्ञांचं म्हणणं
या दोघांच्या मृत्यूची चार कारणं असू शकतात असं कलिना फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. १) हृदयविकाराचा तीव्र झटका २) अन्ननलिका आणि फुफ्फुसांमध्ये अन्नाचे कण अडकून फुफ्फुसांना सूज आलेली असू शकते त्यावर उपचार न झाल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता. ३) दोघंही सुरूवातीला बेशुद्ध झाली असतील आणि त्यांच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा योग्य प्रमाणात झाला नसेल. ४) व्हायग्राचा ओव्हरडोस या कारणांमुळे या दोघांचा मृत्यू झालेला असू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मिड डे ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.