Mumbai Zaoba Wadi Ganesh Workshop : स्वातंत्र्यपूर्व काळापासून भाविकांसाठी गणेशमूर्ती घडविणाऱ्या मादुस्कर कुटुंबियांची तब्बल ७० वर्षे जुनी गिरगावातील झावबा वाडीतील गणेश कार्यशाळा इमारतीच्या पुनर्विकासामुळे काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी या गणेश कार्यशाळेतून शेवटची गणेशमूर्ती भाविकांच्या हवाली करताना मूर्तिकार, कारागिर हेलावले होते. वडिलांकडून गणेशमूर्ती साकारण्याचे धडे गिरवत एक प्रख्यात मूर्तिकार म्हणून नावलौकीक मिळविणाऱ्या प्रदीप मादुस्कर यांनी बुधवारी जड अंत:करणाने गणेश कार्यशाळा रिकामी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहानपणीच आई – वडिलांचे छत्र हरपल्याने चिपळूण जवळील खरवते गावातून गुहागरमधील तळवली गाव गाठणाऱ्या रामकृष्ण विष्णु मादुस्कर यांनी काही वर्षांनी रोजगाराच्या शोधात मुंबई गाठली. रामकृष्ण विष्णु मादुस्कर मुंबईत सुरुवातीला भिक्षुकी आणि एका हॉटेलमध्ये नोकरी करून उदरनिर्वाह करीत होते. गावी असताना त्यांना मूर्तिकामाचा छंद जडला होता. सुबक मूर्ती साकारण्यात त्यांचा हातखंडा होता. मुंबईतील हॉटेलमध्ये नोकरी करता करता त्यांनी बोराबाजारातील एका इमारतीच्या जिन्याखाली गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली. मात्र इमारत मालकाने विरोध केल्यामुळे त्यांनी गिरगाव परिसरातील झावबाच्या वाडीतील अमृत भुवनमध्ये एक छोटेखानी खोली घेतली आणि १९३९ पासून ते तेथेच गणेशमूर्ती घडवू लागले. तेथेच ते राहायचे. हळूहळू मूर्तिकामात जम बसल्यानंतर त्यांनी १९५४ मध्ये समोरच्याच दिनशा चाळीतील तळमजल्यावरील २०० चौरस फुटांची जागा घेतली आणि तेथे रा. विक. मादुस्कार आर्ट ही गणेश कार्यशाळा सुरू केली. या कार्यशाळेत ते वर्षाला शाडूच्या मातीपासून तब्बल १५० ते २०० गणेशमूर्ती साकारत असत. त्याचबरोबर गिरगावातील दुसरा कुंभारवाडा, पूर्वाश्रमीचे व्हीटी स्थानक, माहीम – धारावीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी साडेपाच फूट उंच शाडूची गणेशमूर्तीही ते घडवत होते. दिग्गज कलाकार, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मादुस्करांच्या कार्यशाळेत गणेशमूर्ती घेण्यासाठी येत होते. सुबक आणि आकर्षक गणेशमूर्तींमुळे अल्पावधीतच भाविकांकडून गणेशमूर्तीसाठी मागणी वाढू लागली. तोपर्यंत मादुस्कर कुटुंबातील इतर सदस्यही मूर्तिकामास मदत करू लागले. जागा अपुरी पडू लागल्यामुळे मादुस्करांनी १९५६ मध्ये गिरगावातील शांताराम चाळीत तळमजल्यावरील एक जागा घेतली आणि तेथे दुसरी गणेश कार्यशाळा सुरू केली. गणेशमूर्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. केवळ मुंबईतच नव्हे तर परराज्यात आणि विदेशातही मादुस्करांच्या गणेशमूर्तींना मागणी वाढू लागली. रामकृष्ण यांच्या तीन पुत्रांपैकी प्रदीप यांना मूर्तिकामाची आवड होती. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आट्र्समधून शिल्पकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ते हळूहळू प्रदीप तालमीत गणेशमूर्ती साकारण्यात तरबेज झाले. कालौघात त्यांच्याकडे गणेश कार्यशाळेची सूत्रे आली. दरम्यानच्या काळात गणेशमूर्तींची मागणी वाढत गेली आणि दोन्ही गणेश कार्यशाळांमध्ये साधारण तीन हजार गणेशमूर्ती घडू लागल्या. मादुस्करांची आकर्षक अशी वैभवसंप्पन्न गणेशाची मूर्ती भाविकांच्या पसंतीला उतरली.

हेही वाचा : राज्य सरकारचे धोरण उद्योगांना मारक! आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र

‘पुढच्या वर्षी कार्यशाळा दिसणार नाही’

गिरगावातील झावबावाडी आणि मादुस्करांची गणेश कार्यशाळा असे समीकरण होते. आता झावबावाडीत पुनर्विकासाचे वारे वाहू लागले असून त्यात दिनशा चाळीचाही समावेश आहे. समूह पुनर्विकासासाठी हळूहळू एकेक चाळ पाडण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच दिनशा चाळीवरही हातोडा पडणार आहे. त्यामुळे गणेश कार्यशाळा अन्यत्र हलवून जागा रिकामी करण्याची विनंती प्रदीप मादुस्करांना विकासकाने केली होती. परंतु ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कार्यशाळा रिकामी करणे शक्य नव्हते. त्यामुळे विकासकाला विनंती करून प्रदीप मादुस्करांनी मुदतवाढ मिळविली. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांना या कार्यशाळेतून गणेशमूर्ती देणे शक्य झाले. मात्र पुढच्या वर्षी या गणेश कार्यशाळेतून गणेशमूर्ती मिळणार नाही असे सांगताच भाविकांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. पुनर्विकासात चाळ जात असल्याचे समजताच तब्बल ७० वर्षे जुनी कार्यशाळा भाविक डोळ्यात साठवून घेत होते. पुढच्या वर्षी ही कार्यशाळा दिसणार नाही या भावनेने मूर्तिकार, कारागिर आणि भाविक यांचा कंठ दाटून येत होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai girgaon zawba wadi ganesh idol making 70 year old workshop to be closed pradeep maduskar mumbai print news css