एसटी महामंडळाची प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंद पडलेली मुंबई-गोवा व्होल्वो बस सेवा पुन्हा एकदा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. १५ एप्रिलपासून सुरू होणारी ही बससेवा उन्हाळ्यापुरती चालविण्यात येणार असून प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी खासगी बसपेक्षा या बसचे भाडे कमी ठेवण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
अलीकडेच मुंबई-गोवा मार्गावर खासगी बसला झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओघ वाढला असल्याचे महामंडळाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी पुन्हा वातानुकूलित ‘शिवनेरी’ सुरू करण्यात आली आहे. या वेळी प्रवासाचे भाडे खासगी बसपेक्षा कमी ठेवण्यात आले आहे. खासगी बसला १६०० रुपये भाडे असून त्यात प्रौढ किंवा लहान असा फरक करण्यात आलेला नाही. महामंडळाच्या शिवनेरीचे भाडे प्रौढांसाठी १२४२ रुपये तर लहान मुलांसाठी ६२१ रुपये आकारण्यात येणार आहेत.
ही बस गोव्याला जाताना मुंबई सेंट्रल येथून रात्री ८ वाजता सुटेल तर परतीच्या प्रवासात ही बस दुपारी चार वाजता सुटणार आहे. ही बस गोव्याला जाताना कोकणमार्गे तर परतताना कोल्हापूरमार्गे येणार आहे.
दरम्यान, एसटी महामंडळ १५ एप्रिलपासून दररोज ५७२ अतिरिक्त फेऱ्या सोडणार आहे.
एसटी कामगारांना १३ टक्के वेतन वाढ देण्याबाबतचा निर्णय शुक्रवारी रात्री केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा