मुंबई : निवडणूक आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजू तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे. त्याचबरोबर या दुसऱ्या बाजूची आणि बर्फीवाला पुलाची जोडणी करण्याच्या कामालाही आता वेग येणार आहे. त्याकरीता लवकरच बर्फीवाला पुलाची उर्वरित बाजू वर उचलण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. एप्रिलपर्यंत संपूर्ण गोखले पूल व संपूर्ण बर्फीवाला पुलाच्या दोन्ही बाजू सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
अंधेरी स्थानकात रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या गोखले पुलाची उत्तर दिशेची बाजू फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. मात्र अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. त्यामुळे बर्फीवाला पूल बंदच ठेवावा लागला होता. तसेच या दोन पुलांमध्ये अंतर पडल्यामुळे मुंबई महापालिकेवर टीकाही झाली. पालिकेच्या कारभाराचे हसेही झाले. त्यामुळे गोखले पूल व बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून बर्फीवाला पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार बर्फीवाला पुलाची एक बाजू वर उचलण्याचे अवघड काम पूर्ण करून जुलै २०२४ पासून बर्फीवाला पूल आणि गोखले पूल या दोन्ही पुलांची उत्तरेकडची बाजू जोडून सुरू करण्यात आली. मात्र या दोन्ही पुलाची दक्षिणेकडची बाजू जोडण्याचे काम अद्याप शिल्लक आहे. गोखले पुलाची दक्षिणेकडची बाजू विविध गोष्टींमुळे रखडली आहे.
हेही वाचा…‘प्रथम प्राधान्य’कडे इच्छुकांची पाठ म्हाडाच्या ११ हजार घरांच्या विक्रीसाठी २९ ठिकाणी स्टॉल्स
गोखले पुलाच्या दक्षिणेकडील बाजूची तुळई नुकतीच रेल्वे मार्गावर स्थापन करण्यात आली आहे. तसेच तुळई आठ मीटरपर्यंत खाली आणण्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तुळईवरील कॉंक्रीटीकरण करण्याबरोबरच पुलाच्या पोहोच रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आले आहे. ही कामे सुरू असतानाच आता बर्फीवाला पुलाची दक्षिणेकडची बाजू उचलण्याच्या कामालाही लवकरच सुरूवात होणार आहे. एप्रिल महिन्यात गोखले पुलाची दक्षिण बाजू सुरू करताना बर्फीवाला पुलाचीही दक्षिण बाजू जोडून हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असेल.
३ हजार मेट्रिक टन
अंधेरी पश्चिमेला सीडी बर्फीवाला पूल हा इंग्रजी ‘वाय’ आकाराचा पूल आहे. हा पूल पुढे गोखले पुलाला जोडला जातो. त्यामुळे गोखले पुलाचे काम सुरू असतानाच बर्फीवाला पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामाला १५ डिसेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. व्हीजेटीआय या संस्थेने आपल्या अहवालात एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या सल्लागार संस्थेची शिफारसही केली होती. त्यानुसार या अवघड कामासाठी आधीच्याच कंपनीला ३ कोटींच्या कंत्राटाचा कार्यादेश देण्यात आला आहे. तीन हजार मेट्रीक टन वजनाचा हा पूल उचलून तो गोखले पुलाच्या समांतर पातळीवर आणण्याचे काम पुन्हा एकदा या तज्ज्ञ पथकामार्फत केले जाईल. या कामासाठी ९० दिवसांचा कालावधी असेल. ‘एसएमसी’ या संस्थेने एका बाजूचे काम ७८ दिवसांत पूर्ण केले होते.