मुंबई : गोरेगाव पूर्वेला संतोष नगर परिसरात चित्रनगरी प्रवेशद्वाराजवळच्या झोपड्यांना गुरुवारी सायंकाळी सात वाजता भीषण आग लागली. त्यात शंभरहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत पाच ते सहा गँस सिलिंडरचेही स्फोट झाल्याचे समजते. या आगीवर रात्री उशीरा नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरेगाव पूर्वेला संतोष नगर येथील आरे युनिट क्रमांक ३२ जवळच मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास येथील झोपड्यांना अचानक भीषण आग लागली. लाकडी साहित्य, विद्युत वाहिन्या इत्यादीमुळे ही आग पसरत गेली. या झोपडपट्टी भागात चित्रीकरणाचे साहित्य ठेवण्यासाठी गोदामही असून ही गोदामेही आगीत सापडली.

झोपड्यामध्ये असलेल्या पाच ते सहा गँस सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे आग आणखी पसरली अशी महिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या घटनेची माहिती मिळताच आठ फायर इंजिन आणि ११ वॉटर टँकरसह अग्निशमन दल दाखल झाले. रात्री आगीची तीव्रता पाहता आग ही स्तर दोनची घोषित करण्यात आली. धुसमत असलेली आग आणि प्रचंड धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला अडचणी येत होत्या. अखेर रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत शंभरहून अधिक झोपड्या आणि गोदाम जळाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. आग लागण्यामागील नेमके कारण मात्र समजू शकले नाही.