हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना मंगळवारी मनस्तापाचा सामना करावा लागला. हार्बर रेल्वेवरील वडाळा- अंधेरीदरम्यान पॉईंट फेल झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
हार्बर रेल्वेवर मंगळवारी संध्याकाळी वडाळ्याहून निघालेली लोकल ट्रेन किंग्ज सर्कल स्टेशनजवळ पोहोचली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही रेल्वे खोळंबली. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे पाऊण तास ही लोकल खोळंबून होती असे वृत्त आहे. पॉईंट फेल झाल्याने लोकल ट्रेन खोळंबल्याचे समजते. ऐन गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेन खोळंबल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अद्याप दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले. हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील गर्दी वाढली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवरील वाहतूकही विलंबाने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरु असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.