Atal Setu Mumbai Video: अटल सेतू किंवा मुंबई ट्रान्स हार्बर सीलिंक (MTHL) लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी जाहीर केल्यानुसार १२ जानेवारीपर्यंत या सीलिंकचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या सीलिंकचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या युट्युब चॅनेलवरून या अटल सेतूची झलक शेअर केली आहे. २०१८ पासून या १८००० कोटी रुपयांच्या सेतूच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. नियोजनानुसार हे काम ४.५ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कोविड-19 महामारीमुळे पाहा प्रकल्प आठ महिन्यांनी लांबणीवर पडला होता.
शिवडीला मुख्य भूभागावरील न्हावा-शेवाशी जोडणारा २२ किमी लांबीचा सहा-लेन पूल, १६.५ किमी लांबीचा समुद्रमार्ग आणि जमिनीवरील ५.५ किमी मार्गांचा अटल सेतूमध्ये समावेश आहे. या सेतूच्या बांधकामासाठी १७७,९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५०४,२५३ मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे. सध्या, नवी मुंबईला जाण्यासाठी दोन प्रवेश पॉईंट्सआहेत- एक ऐरोली-मुलुंड कनेक्टर आणि दुसरा वाशी कनेक्टर. जर कोणी अलिबाग किंवा माथेरान किंवा लोणावळ्याला जात असेल तर ते अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी असलेल्या या कनेक्टर मार्गे जातात. MTHL मुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ कमी होऊन रायगड जिल्ह्यासह आर्थिक एकीकरण होण्यासाठी मदत होईल असा अंदाज आहे.
Video: पंतप्रधान मोदींनी दाखवली अटल सेतूची झलक
हे ही वाचा<< “कमळवालेच राममंदिर बनवणार..”, २०० वर्षांपूर्वीच्या ‘या’ नाण्यात मिळाला पुरावा? ब्रिटिशांनी रामाची नाणी घडवली का?
दरम्यान, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणून ओळखल्या जाणार्या अटल सेतूच्या उद्घाटनापूर्वी, मुंबई पोलिसांनी वाहनांच्या वेग मर्यादेबाबत नियम जाहीर केले आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, अटल सेतू पुलावर चारचाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा १०० किमी प्रतितास असेल. पुलावर चढताना आणि उतरताना वेग ४० किमी प्रतितास इतका मर्यादित असेल. या सागरी सेतूवर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.