महागाई, निर्गुतवणूक, वेतनवाढ अशा विविध मागण्यांसाठी देशातील प्रमुख कामगार संघटना, वाहतूकदार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसीय ‘भारत बंद’ला आजपासून (बुधवार) सुरुवात झाली आहे. मात्र, शिवसेनेसह सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने केवळ औद्योगिक बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केल्यामुळे बंदचा फारसा परिणाम मुंबईच्या सामान्य जनजीवनावर होणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपात सहभागी असल्याने आर्थिक व्यवहार कोलमडतील.
२० हजार कोटींचा फटका?
बुधवार आणि गुरुवारच्या या दोन दिवसांच्या भारत बंदमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुमारे २० हजार कोटी रुपयांचा फटका बसेल, असा अंदाज असोचेम या ओद्योगिक क्षेत्रातील संघटनेने व्यक्त केला आहे.
बँकाचे व्यवहार थंडावणार!
महाराष्ट्रात मंगळवारी बँकांना सार्वजनिक सुट्टी होती. बुधवार-गुरुवारी भारत बंदमुळे मुंबईसह महाराष्ट्रातही बँकिंग व्यवहारांना फटका बसणार आहे. सुमारे दहा लाख बँक कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होतील, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले.
संपकऱ्यांना इशारा
देशव्यापी संपात सरकारी कर्मचारी सहभागी होऊन त्याचा कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. संपकाळातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून सुट्टी घेणाऱ्या अथवा संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
बारावी सुरक्षित!
बंदचा फटका गुरुवारपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांना बसू नये याची काळजी सर्वांनीच घेतल्याने या परीक्षा सुरळीत होतील, असा विश्वास राज्य सरकारनेही पालक-विद्यार्थ्यांना दिला आहे. वाहतूक विस्कळीत होणार नसल्याने, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात कोणतीच अडचण असणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.
हे बंद..
बँकांचे व्यवहार, उद्योगधंदे, एसटी सेवा, मालवाहतूक.
हे सुरळीत..
जीवनावश्यक सेवा, मुंबईतील रेल्वे, बस, टॅक्सी, रिक्षा, रुग्णालये, शाळा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा