मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तसंच मुंबईच्या मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवरही पाणी साठलं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऑफिस गाठणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अशातच मुंबईत सहा तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तसंच महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.
मुंबईत सखल भागांमध्ये साठलंं पाणी
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.
हे पण वाचा- मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रान्स हार्बर उशिराने
मुंबई महापालिकेने काय आवाहन केलं आहे?
हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
मुंबई महानगरात सहा तासांत ३०० मिमी पावसाची नोंद
मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे.
या ट्रेन्स करण्यात आल्या रद्द
ममनाड मुंबई-पंचवटी एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन
पुणे सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईत ८ ते १३ जुलै काय असेल पावसाची स्थिती?
मुंबईत ८ ते १३ जुलै या कालावधीत ढगाळ वातावरण राहणार आहे. ८ जुलै रोजी मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ जुलै रोजी हलक्या पावसासह तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. १० जुलै रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे. ११ जुलै मध्यम तर १२ आणि १३ जुलैला चांगल्या पावसाचा अंदाज आहे.