पुण्याच्या जर्मन बेकरीमध्ये घडविण्यात आलेल्या स्फोटाची सीसीटीव्ही चित्रफीत उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) द्यावेत, ही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. हा मुद्दा सध्या महत्त्वाचा नसून त्याबाबत नंतर विचार केला जाईल, असे स्पष्ट करीत न्यायालयाने ही मागणी फेटाळली.
स्फोटातील एकमेव आणि कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी हिमायत बेग याच्या शिक्षेविरोधातील अपिलावर तसेच राज्य सरकारने शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणावर न्यायमूर्ती विजया कापसे- ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. गेल्या वेळच्या सुनावणीत ‘एनआयए’ने याचिका करून बेकरीबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालेले चित्रिकरण देण्याचे एटीएसला आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. सोमवारच्या सुनावणीत एटीएसने एनआयएला सीसीटीव्ही चित्रफीत देण्याची तयारी दर्शवली. मात्र यापुढे या चित्रफितीाबाबत कुठल्याही प्रकारची मागणी केली जाऊ नये, प्रसिद्धीमाध्यमांना त्याबाबत माहिती देऊ नये, असे आश्वासन देण्यात येणार असेल तरच आपण ही चित्रफीत देऊ, असे एटीएसतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader