मुंबई : पावसाळ्यात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हिवताप, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वर, चंडीपूरा मेंदूज्वर, तर कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये लेप्टोस्पायरोसीस, शहरी भागात डेंग्यू अशा विविध आजाराच्या साथी पसरतात. या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती व रुग्णालयांना दिल्या आहेत.
पावसाळ्यात राज्यात विविध साथींचे आजार पसरतात. त्यामुळे साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृह भेटींमध्ये वाढ करण्याबरोबरच पंधरवडा सर्वेक्षण दिनदर्शिका तयार करावी, जलजन्य, कीटकजन्य आजाराच्या रुग्णांचा शोध घेऊन नागरिकांना साथरोगाचा प्रसार, प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय, घ्यावयाची काळजी याची माहिती देण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याने जोखिमग्रस्त गावांची यादी तयार करावी, जलजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी पाणी स्त्रोतांची प्रभावी गुणवत्ता सनियंत्रण करणे, प्रत्येक ग्रामपंचायत, नगर पालिका, महानगरपालिकेच्या ठिकाणी विरंजक चुर्णाचा साठा उपलब्ध करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : मुंबई: पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लाॅक रद्द
गावागावांत दर आठवड्याला सर्वेक्षण करून तेथील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावी, कीटकनाशक फवारणी करावी, त्याचप्रमाणे उपकेंद्र, जिल्हा रुग्णालये आदींमध्ये आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणत उपलब्ध करावी. दुर्गम भागातील आरोग्य संस्थामध्ये किमान तीन महिने पुरेल एवढा औषधांचा पुरवठा करावा.तसेच साथरोग प्रभावीपणे सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविकांचा सहभाग घेणे, साथरोग नियंत्रणासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, कृषी, नगरविकास आणि पशुसंवर्धन अशा विविध विभागांशी नियमित समन्वय ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
हेही वाचा : ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ आणि ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपट १४ जून रोजी
नियंत्रण कक्ष सुरू करावा
पावसाळयात आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला परिणामकारकपणे तोंड देण्यासाठी तालुका, जिल्हा तसेच उपसंचालक स्तरावर २४ x ७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा, तसेच साथरोग उद्रेक वेळेत नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा तसेच उपसंचालक स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथक नेमण्यात यावे. यात साथरोगतज्ज्ञ, प्रयोगशाळेतील तज्ज्ञ अशा व्यक्तींचा समावेश असावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.