मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे येथील महा मेगाब्लाॅकमुळे प्रवासी प्रचंड हैराण झाले असून शनिवारी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर उन्हाची दाहकता, रेल्वे ब्लाॅकमुळे लोकल फेऱ्यांचा झालेला खेळखंडोबा, रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी, बेस्टच्या बसमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी या सर्व समस्यांना सामोरे जात नोकरदारांना कार्यालय गाठावे लागले. परतीच्या प्रवासातही प्रवासी मेटाकुटीस आले.
मध्य रेल्वेवरील ठाणे येथील फलाट क्रमांक ५-६ वरील कामे सुरू असल्याने ६३ तासांचा ब्लाॅक शनिवारीही सुरूच होता. सीएसएमटी येथे फलाट क्रमांक १०-११ चे विस्तारीकरण करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री १२.३० पासून ब्लाॅक सुरू झाला. त्याचे पडसाद शनिवारी सकाळपासून उमटू लागले होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शनिवारी कार्यालयात पोहोचण्यास प्रचंड धावपळ करावी लागली. सीएसएमटी – भायखळा आणि सीएसएमटी – वडाळा लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांना बेस्ट सेवेवर अवलंबून राहावे लागले. मात्र, प्रवाशांच्या गर्दीमुळे बेस्टच्या फेऱ्या तोकड्या पडल्याचे दिसत होते. परिणामी, प्रवाशांना प्रचंड दगदग झाली. बेस्ट बसमध्ये प्रवाशांना उभे राहण्यास देखील जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांना बसच्या दरवाज्याजवळ लटकत प्रवास करावा लागत होता. तर, अनेकांना बसमध्ये शिरताही आले नाही. त्यामुळे अनेकांना पुढच्या बसची प्रतीक्षा करावी लागत होती.
हेही वाचा – अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार
मध्य रेल्वेने शनिवारी सुट्टीकालीन लोकल वेळापत्रक जाहीर करून यात ५३४ लोकल फेऱ्या रद्द केल्या. ब्लाॅक काळात खासगी क्षेत्रातील कर्मचारी घराबाहेर पडलेल्या आणि महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना लोकल विलंबाचा सामना करावा लागला. लोकल शनिवारी सकाळपासून ३० मिनिटांहून अधिक काळ विलंबाने धावत होती. कल्याण, डोबिंवली, दिवा, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
भायखळ्यापर्यंत लोकल धावण्याचा फलक
मध्य रेल्वेवरील लोकल सीएसएमटी, दादर, परळ, कुर्ला, ठाण्यापर्यंत धावत असल्याने फलटावर कायम या स्थानकांची नावे आणि त्यांच्या सांकेतिक शब्द लिहिलेला असायचा. मात्र, ब्लाॅक काळात बऱ्याच लोकल भायखळ्यापर्यंत धावत असल्याने शनिवारी भायखळा आणि ‘बीवाय’ असा सांकेतिक शब्द फलकावर दर्शविण्यात येत होता. दरम्यान, कोणती लोकल कुठपर्यंत जाणार हे कळत नसल्याने अनेकांचा गोंधळ उडाला होता. भायखळापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना दादरची लोकल मिळाल्याने त्यांना दुसरी लोकल पकडून भायखळा गाठावे लागत होते.
ब्लाॅकबाबत अनेक प्रवासी अनभिज्ञ
मुंबईसारख्या शहरात दररोज नवनवीन लोक येत असतात. तसेच साप्ताहिक सुट्टी असल्याने अनेक पर्यटकांचा मुंबईत जाण्याचा कल असतो. मात्र, नवखे लोक आणि पर्यटक रेल्वे ब्लाॅकबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांची गैरसोय झाली. कुटुंबासह घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मुंबई गाठणे कठीण झाले. तसेच अनेक प्रवासी भायखळ्यापर्यंतचा लोकल प्रवास करून सीएसएमटीच्या लोकलसाठी थांबलेल्याचे दिसत होते. मात्र, बराच वेळ सीएसएमटीला जाण्यासाठी लोकल न आल्याने त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरची वाट धरली.
हेही वाचा – भविष्यात बेस्टची बस सेवा कोलमडण्याची शक्यता, मे महिन्यात ५५६ कर्मचारी निवृत्त
सीएसएमटी स्थानकात शुकशुकाट, भायखळ्यात गोंधळ
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या सीएसएमटी येथून दररोज ११ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेच्या हार्बर आणि मुख्य मार्गिकेच्या सीएसएमटी स्थानकात लोकल न आल्याने स्थानक परिसर गर्दी विरहीत दिसत होता. शनिवारी संपूर्ण दिवस सीएसएमटीचे सातही फलाटावर एकही प्रवासी नसल्याने स्थानकात शुकशुकाट होता. टाळेबंदी काळात सीएसएमटी स्थानकात शुकशुकाट दिसत होता. तशीच स्थिती शनिवारी होती. तसेच लोकल भायखळ्यापर्यंत येत होत्या. त्यामुळे भायखळ्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच पुढील प्रवासासाठी बस शोधणाऱ्या प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला होता. प्रत्येक पादचारी पुलावर प्रवाशांची गर्दी होती. तसेच भायखळा पश्चिमेकडील बेस्टच्या बस स्थानकात प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.
एसटी रिकामी, बेस्टवर ताण
मध्य रेल्वेवरील ठाणे आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी ब्लाॅक घेतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि बेस्टच्या जादा फेऱ्या चालविण्यात आल्या. मात्र, एकीकडे एसटीमधून मोजकेच प्रवासी प्रवास करीत होते, तर, दुसरीकडे बेस्टच्या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत होती. त्यामुळे बेस्ट सेवेवर प्रचंड ताण आला होता.
रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाने गुरुवारी रात्री १२.३० वाजल्यापासून बेस्टच्या ५५ बसच्या ४८६ जादा फेऱ्या चालविण्यास सुरुवात केली. कुलाबा, धारावी, बॅकबे, प्रतीक्षानगर, वडाळा, मुंबई सेंट्रल, काळा किल्ला, आणिक या बेस्ट आगारांमधून बस सोडण्यात आल्या. मात्र सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी जादा बसची सेवा अपुरी पडली. त्यामुळे वडाळा, भायखळ्यावरून जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वडाळ्यावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना बस मिळत नव्हत्या. तसेच ज्या बस येत होत्या, त्यात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांना बेस्टच्या दरवाजाला लटकून प्रवास करावा लागत होता. हीच परिस्थिती पूर्व-पश्चिम उपनगरात दिसत होती. दुपारी १२ वाजल्यानंतर दोन बस फेऱ्यांमधील अंतर २० ते ३० मिनिटांवर गेले. त्यामुळे प्रवाशांना दुपारी कडक उन्हात थांब्यावर ताटकळत उभे राहण्याची वेळ आली.
प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार जादा बस फेऱ्या चालवण्यात येतील, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रवाशांची गर्दी वाढल्यानंतरही बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली नाही. तसेच रिक्षा, टॅक्सीचालकांनी जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. परिस्थितीचा फायदा घेत काही रिक्षा, टॅक्सीचालक मीटरप्रमाणे पैसे न घेता मनाला वाटेल ते भाडे प्रवाशांकडून वसूल करीत होते.
ब्लाॅक कालावधीत राज्य परिवहन (राज्य) महामंडळाने कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा एसटी बस चालविल्या. मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातील २४ एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. मात्र, एसटीमध्ये प्रवाशांची संख्या कमी दिसत होती. एसटीचा मार्गात मोजकेच थांबे असल्याने आणि एसटीसाठी जादा पैसे मोजावे लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी बेस्टचा पर्याय स्वीकारला होता.