मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा जाणवत असला तरी मुंबईकरांना दुपारी उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. मुंबईकर शुक्रवारीही घामाच्या धारांनी हैराण झाले होते. सतत उन्हामध्ये काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मुंबईकरांनी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. यामुळे काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा ताप वाढला आहे. कडकडीत ऊन, असह्य उकाडा आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाही होत आहे. शुक्रवारी सकाळपासून उकाडा जाणवत होता. सकाळी दहानंतरच उन्हाची तीव्रता वाढली आणि झळा जाणवू लागल्या. दुपारी घरात आणि बाहेर फिरतानाही उन्हाचा दाह जाणवत होता. रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत होते. उन्हाच्या काहिलीने बेजार झालेल्या नागरिकांचा थंडगार उसाचा रस, लिंबू सरबत, ताक आदी पेये पिण्याकडे कल वाढत आहे. दरम्यान, फेब्रवारीच्या मध्यापासून मुंबईतील तापमानाचा पारा ३५ अंशापार पोहोचला आहे. यामुळे येता उन्हाळा आणखी तापदायक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होतो. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. कडक उन्हामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडत असून ताप, सर्दी, डोकेदुखी याबरोबरच डोळे कोरडे हेणे, पोटदुखी अशा त्रासांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवत आहे.
काय काळजी घ्यावी
– दिवसा उष्णता असेल्यास घराच्या खिडक्या आणि दरवाजे काही वेळापुरते बंद करावे. त्यामुळे उष्णता घरात येत नाही.
– गडद रंगाचे पडदे वापरावे, त्यामुळे थेट सूर्यप्रकाश रोखला जाईल.
– मायक्रोव्हेव, स्टोव्ह आणि ड्रायर यांसारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर कमीत कमी करावा.
– भरपूर पाणी प्या.
– आवश्यकता असेल, तरच दुपारी बाहेर जा.
– द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवा.
– तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
– उघड्यावर ठेवलेल्या बर्फाचा वापर करून तयार केलेल्या पेयांचे सेवन करू नये.
उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे
– संबंधित व्यक्तीला तातडीने थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये हलवावे.
– शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
– पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ द्या.