मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीसह विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रंचड गर्दी बघायला मिळत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणीही साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोडींचाही सामना करावा लागतो आहे. महत्त्वाचे म्हणजे हवामान विभागाने उद्या सकाळी ८.३० पर्यंत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या इशाऱ्यानंतर आता उद्या ( गुरुवारी ) मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत महापालिका प्रशासनाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक २६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे, असं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच आवश्यकता असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानकांवर गेल्या दोन तासांपासून रेल्वे थांबल्या आहेत. तसेच पश्चिम मार्गावर जलद लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने असून स्लो मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी पाहायला मिळते आहे. तर कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुंड येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने नद्यांचं स्वरुप आलं आहे.
हेही वाचा – Mumbai Rain : मुंबईतल्या पावसाने उडवली लोकल सेवेची दाणादाण, घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे येथे दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक एस. व्ही रोडने वळवण्यात आल्याची माहिती आहे. मुलुंड, विक्रोळी पट्टयात ठिकठिकाणीही पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोडींचा सामनाही करावा लागतो आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गणेशोत्सव काळातही तुरळक पाऊस झाला होता. मात्र आज अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत.