गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा पाणीप्रश्न आता मिटण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी आणखी एक तलाव पूर्णपणे भरल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हे धरण भरून वाहू लागले. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणारी अन्य धरणेही येत्या काही दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वी तुलसी, तानसा आणि मोडकसागर ही तीन धरणे पूर्णत: भरली होती. 12 जुलै रोजी तुलसी, तर 25 जुलै रोजी तानसा आणि त्यानंतर 27 जुलै रोजी मोडकसागर धरण भरून वाहू लागले होते. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 85.68 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी जुलै अखेरीस मुंबईतील धरणांमध्ये 83.30 टक्के पाणीसाठा जमा झाला होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांतील जलसाठ्यात तब्बल 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणातही चांगली पाण्याची पातळी वाढली असून धरणे ओसंडून वाहिल्यास आजूबाजूच्या गावांना फटका बसू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
गेल्या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला, पण नंतर पावसाने विश्रांती घेतली व धरणात 9 टक्के पाण्याची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे 10 टक्के पाणी कपात लागू करावी लागली होती. यावर्षी धरणे 50 टक्के भरल्यानंतर ही पाणी कपात मागे घेण्यात आली. त्यामुळे पालिकेवर टीका होऊ लागली होती. धरणातील पाण्याची तूट कशी भरून निघणार असा सवाल केला जात होता. मात्र गेल्या 11 दिवसांत पडलेल्या पावसामुळे पालिकेचा जीव भांड्यात पडला आहे. मुंबईला दरदिवशी 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरले तरच हा पाणीपुरवठा करता येतो. सातही तलावांची पाणीसाठ्याची क्षमता साडेचौदा दशलक्षलिटर आहे. बुधवारी सकाळी सातही तलावात मिळून 12 लाख 20 हजार 112 दशलक्षलिटर म्हणजेच 85.16 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, अजून दोन लाख दशलक्षलिटर म्हणजेच 15 टक्के पाण्याची तूट शिल्लक आहे. गेल्यावर्षी पाणीसाठा खूपच खालावल्यामुळे यंदा धरणे भरण्यास वेळ लागला.