मुंबई : विभक्त पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंबानी यांच्या हत्येप्रकरणी चित्रकार चिंतन उपाध्याय याला दिंडोशी येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. न्यायालयाने चिंतन याला हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात दोषी ठरवले आहे. न्यायालय त्याच्या शिक्षेचा निर्णय शनिवारी देणार आहे.
चिंतन याच्यासह हेमा आणि तिच्या वकिलाची हत्या करणाऱ्या तिघांना न्यायालयाने हत्येच्या आरोपात दोषी ठरवले. आरोपींनी या प्रकरणी एका वकिलाचीही हत्या केली आहे. हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. त्यामुळे, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
हेही वाचा : घरांचा साठा रोखणारा ‘म्हाडा’ निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा छडा लावू न शकलेल्या पोलिसांनी आपल्या वैवाहिक कलहाचा गैरफायदा घेतला. तसेच आपल्याला लक्ष्य करून याप्रकरणी गोवले, असा दावा चिंतन याच्याकडून सरकारी पक्षाने त्याच्याविरोधात न्यायालयात सादर केलेल्या साक्षीपुराव्यांवर आरोपी म्हणून म्हणणे मांडताना केला होता. अटकेनंतर पोलिसांनी बळजबरीने आपला कबुली जबाब घेतला. त्यासाठी पोलिसांनी आपला अतोनात छळ केल्याचा दावाही उपाध्याय याने केला होता.
हेही वाचा : मुंबई पारबंदर प्रकल्प : सागरी सेतूचे संचालन; देखभालीसाठी लवकरच आंतरराष्ट्रीय कंत्राटदाराची नियुक्ती
हेमा आणि भंबानी यांची ११ डिसेंबर २०१५ रोजी हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांचे मृतदेह एका खोक्यात ठेवून कांदिवली येथे फेकण्यात आले होते. मुख्य आरोपी विद्याधर राजभर हा फरारी असताना, हेमा हिच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी उपाध्याय याला अटक केली होती. उपाध्याय याला वैवाहिक वाद संपवायचा होता. म्हणूनच त्याने हेमाच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप होता. सहा वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उपाध्याय याला जामीन मंजूर केला होता.