मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेला मद्यविक्री बंदीचा आदेश हा मतमोजणीच्या निकालापर्यंतच लागू आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच, मद्यविक्रीच्या बंदीबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा केली. नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने उपरोक्त बाब स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात सुधारणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार, दोन्ही मतदारसंघात मतदानाच्या ४८ तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत संपूर्ण दिवस मद्यविक्री बंदी आदेश काढला. त्यानुसार, १८ ते २० मे दरम्यान मद्यविक्रीला मनाई कऱण्यात आली. शिवाय, निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे, निकालाच्या दिवशी दिवसभरासाठी मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचे ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. त्या विरोधात याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सुधारित आदेश काढण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

हेही वाचा : हाताने मैला साफ करण्याच्या कुप्रथेचे पुढील दोन वर्षांत निर्मूलन कसे करणार ? – उच्च न्यायालय

मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजेच १८ ते २० मे या काळात पूर्णपणे मद्यविक्री बंदी घालण्याला आमचा आक्षेप नाही. मात्र, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दिवसभरासाठी मद्यविक्रीला बंदी घालणे जाचक असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील आर. डी. सोनी यांनी न्यायालयाला सांगितले. निकालाचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होण्यास सुरुवात होते. सायंकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होते. त्यामुळे, सायंकाळनंतर मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. तसेच, ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी केली. याआधी न्यायालयाने अशाच प्रकारच्या विविध आदेशांचा दाखलाही न्यायालयाला दिला. अतिरिक्त सरकारी वकील अश्विनी पुरव यांनी याचिकाकर्त्यांच्या मागणीला विरोध केला. मात्र, याचिकाकर्त्यांचे म्हणणे विचारात घेऊन खंडपीठाने जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा केली. तसेच, ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश लागू राहिल, असे स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court ban on sale of liquor till the result of counting of votes mumbai print news css